BJP in Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Marathwada BJP Political News : मराठवाड्यात भाजपच्या विजयासाठी `या` दोन राज्यातील आमदारांची टीम दाखल..

Jagdish Pansare

BJP Political News : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघात सापाटून मार खाल्ल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी या भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपाचे सरकार आणण्यासाठी मराठवाड्यातील 25 विधानसभा मतदारसंघावर पक्षाने फोकस ठेवला आहे. यासाठी बाहेरच्या राज्यातून रसद मागवण्यात आली असून छत्तीसगड, झारखंड राज्यातील 16 आमदार, पदाधिकारी कालपासून (ता.30) छत्रपती संभाजीनगरात ठाण मांडून आहेत.

शहरातील दोन हाॅटेलमध्ये हे सगळे आमदार, पदाधिकारी मुक्कामी असून बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्यातील भाजपचे (BJP) काही महत्वाचे नेते या बैठकांमध्ये सहभागी होत असून, उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठवाड्याची रणनिती ठरवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा, बदलापूरसह राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना या सगळ्यामुळे राज्यातील महायुती, विशेषतः भाजपवर रोष वाढला आहे. दोन महिन्यानी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असताना विरोधात गेलेले हे वातावरण बदलून मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या चाणाक्यांनी सुत्रे हलवायला सुरवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अॅक्शन प्लॅनचा भाग म्हणूनच छत्रपती संभाजीनगरात झारखंड, छत्तीसगडमधील 16 आमदारांना पाचारण करण्यात आले आहे. (Marathwada) या राज्यातील भाजपचे काही महत्वाचे पदाधिकारी देखील शुक्रवारी काल शहरात दाखल झाले आहेत. या सगळ्या आमदार, पदाधिकाऱ्यांची व्यवस्था हाॅटेलमध्ये करण्यात आली असून त्यासाठी भाजपने दोन समन्वयक नेमले आहेत.

आज या आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक हाॅटेलमध्ये सुरू असून राज्यातील भाजपचे काही प्रमुख नेते बैठकीत हजर असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. झारखंड, छत्तीसगडचे भाजप आमदार आणि पदाधिकारी कालपासून शहरात मुक्कामी असल्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. हे आमदार थांबलेल्या हाॅटेल बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कुठल्याही परिस्थीतीत जिंकायच्या आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा, असा चंग दिल्लीतील नेत्यांनी बांधला आहे. महायुती म्हणून जरी भाजप राज्यातील विधानसभा निवडणुका लढणार असला, तरी येणारे सरकार हे भाजपच्या नेतृत्वाखालीच असेल, हे सांगायला नेते विसरत नाहीयेत.

छत्तीसगड-झारखंडमधील आमदारांचा शहरातील मुक्काम आणि बैठकांचे सत्र पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेले नुकसान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे जोरदार प्रयत्न पक्षाने सुरु केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT