नायगाव (जि. नांदेड) : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर आता मराठवाड्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याची गरज आहे. तेच मराठवाड्याचे प्रश्न सोडवू शकतात, त्यामुळे अशोकरावांचे नेतृत्व बळकट करण्यासाठीच काँग्रेसमध्ये परत आलो आहे, असे सूतोवाच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. (Joins Congress to strengthen Ashok Chavan's leadership : Bhaskarrao Patil Khatgaonkar)
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी बिलोली देगलूर पोटनिवडणुकीच्या धामधुमीत भाजपला ‘जय श्रीराम’ करत घरवापसीचा निर्णय आठ दिवसांपूर्वी घेतला होता. सात वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपत गेलेल्या खतगावकरांच्या घरवापसीचा भव्य सोहळा बिलोली देगलूर मतदारसंघातील शंकरनगर येथे शनिवारी (ता. २३ ऑक्टोबर) पार पडला. त्यावेळी खतगावकर बोलत होते.
या वेळी भास्करराव खतगावकर यांच्यासह त्यांच्या स्नूषा जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, श्रीराम पाटील राजूरकर, राजू गंदीगुडे, दिपक पावडे यांच्यासह खतगावकरांच्या शेकडो समर्थकांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
खतगावकर म्हणाले की, आमची घरवापसी नाही, तर सुबह का भुला श्याम को घर आया या सदरात मोडते. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ३० वर्ष काम करताना त्यांनी मला भरपूर दिले आहे. त्यामुळे मला कुणाकडे काहीही मागण्याची वेळ आली नाही. मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्या उंचीचा नेता नाही. त्यामुळे त्यांचे नेतृत्व जपले पाहिजे. देगलूर बिलोली मतदारसंघातील राहिलेले प्रश्न सुटले पाहिजेत व माझ्यासोबत ३० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याचे पालकत्व अशोक चव्हाणांनी घ्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली.
मोदीच्या भुलथापांना जनता बळी पडणार नाही : पाटील
सत्तेवर येताना मोदी यांनी मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यात प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचेही आश्वासन दिले होते. ते तर आजपर्यंत मिळालेच नाहीत. पण, मोदींनी आजपर्यंत अनेक फसव्या घोषणा केलेल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील मतदार हे सूज्ञ असून मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या काळातीलच खड्डे अजून बुजवतोय : अशोक चव्हाण
देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपाची मंडळी पातळी सोडून प्रचार तर करतच आहेत पण खोटेनाटे आरोप करत आहेत. महाराष्ट्रातील खड्डे बुजवण्याची डेडलाईन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ता. ३१ डिसेंबर दिली. पण वर्ष सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांचेच खड्डे बुजवण्याचे काम आजपर्यंत चालू असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान आम्ही केलेल्या विकासात्मक कामावर भर दिला आहे पण विरोधक जत्रेला आल्यासारखे येत आहेत आणि काहीही आश्वासन देत आहेत. त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पिकविमा देण्याच्या बाबतीत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचाही आरोप केला. पिक विमा कंपनीला राज्य सरकारने आपल्या हिशाची रक्कम दिली आहे. पण, केंद्र सरकार द्यायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सरचिटणीस संपतराव, माजी आमदार सुभाष वानखेडे, बसवराज पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार भाई जगाताप, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, अनिरुद्ध वनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, हणमंत पाटील बेटमोगरेकर, मारोतराव कवळे गुरूजी, प्रा. यशपाल भिंगे, नामदेव आयलवाड, संजय बेळगे व दिलीप बेटमोगरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.