शिरूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक आहे. त्या भूमिकेशी शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे तालुक्यातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात तालुक्यातील शिवसैनिकांनी आमदार पवार यांच्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी फराटे हेच राजकीय स्टंट करून गंभीर घटनेला वेगळे वळण देत असल्याचा आरोप केला आहे. (Shiv Sena's Shirur taluka chief Sudhir Farate accused by office bearers)
शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, तालुका संघटक कैलास भोसले, तालुका सल्लागार संतोष काळे, युवा सेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव, उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे व अनिल पवार, तालुका समन्वयक आनंदा हजारे, शेतकरी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हनुमंत लांडे, उपशहर प्रमुख स्वप्नील रेड्डी यांनी सह्यांनिशी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनात, आम्ही शिरूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीधर्म म्हणून आमदार ॲड. पवार यांच्या पाठिशी असल्याचे नमूद केले आहे. निनावी पत्रामागील बोलविता धनी कोण आहे, याचा शोध लागावा, यासाठी फराटे यांनी दिलेला उपोषणाचा इशारा हा केवळ दिखाऊपणा आहे. याउलट त्यांनी मांडलेल्या भूमिकेमागील बोलविता धनी कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. त्यांचा उपोषणाचा इशारा हीच स्टंटबाजी असून, तालुक्यातील कुणीही निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका निवेदनाद्वारे मांडली आहे.
आमदार पवार यांना निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीचा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदविला आहे. शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही या गंभीर घटनेची दखल घेत चौकशीची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्या भूमिकेशी तालुक्यातील शिवसैनिक सहमत असून, तीच शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचे व त्या भूमिकेशी आम्ही सहमत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. फराटे हे हाडाचे शिवसैनिक नसून ते लादलेले तालुकाप्रमुख आहेत. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून ते कारखान्यावर निवडून आलेले आहेत. मात्र, आमदारांशी असलेल्या वैयक्तिक आकसापोटी ते भाजपला पोषक भूमिका मांडत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत तालुक्यात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यातही फराटे यांनी जुन्या, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून गटबाजीचे प्रदर्शन केले. स्वतःच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी फराटे हे शिवसैनिकांचा वापर करणार असतील तर निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या मागे फरफटत जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
आमदार पवार यांच्या जीविताबाबत आक्षेपार्ह टीपण्णी असलेल्या पत्राबाबत भूमिका मांडताना सुधीर फराटे यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत. त्यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. खुनाची धमकी असलेल्या पत्रात जे मुद्दे मांडले आहेत, त्याबाबत निषेध करण्याऐवजी अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्या मुद्द्यांचे समर्थन केले आहे, त्यातून त्यांनी आमदार पवार यांच्याविषयीचा आकस व वैयक्तिक द्वेषच दाखवून दिला आहे, असे पोपट शेलार यांनी सांगितले.
शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी खुलासा केला असताना त्यांना परत खुलासा मागण्याची गरज नाही. आमदार पवार यांचे त्यांच्याशी राजकीयच नव्हे़; तर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. नगराध्यक्ष, नगरसेवक यांना विश्वासात घेऊनच ते काम करतात. याबाबत त्रयस्थ माणसांनी बोलणे योग्य नव्हे, असे सुनील जाधव म्हणाले.
सुधीर फराटे यांनी शुक्रवार (ता. २२ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेसाठी मेसेज पाठवून कळविल्याने, तालुकाप्रमुखाचा आदेश म्हणून आम्ही उपस्थित राहिलो. मात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत आमदार पवार व त्यांना दिलेल्या निनावी धमकीवरून मांडलेले मुद्दे आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केले. त्यातील एकाही मुद्द्याशी आम्ही सहमत नाही, असे अनिल काशीद यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.