Marathwada News : पाकिस्तानातील `जैश ए मोहंमद` या अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चार संशयितांना आज शनिवारी (ता.5) पहाटे एनआयए आणि एटीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगरात किराडपुरा आणि अल्तमश कॉलनी भागात तर जालन्याला गांधीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. या संशयितांची रात्री उशीरापर्यंत एटीएसच्या कार्यालयात चौकशी करण्यात आल्यानंतर शहरातील दोघांना नोटीस देत सोडून देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या संशयितामध्ये जालन्यातील एकाचा तसेच छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा येथील एका चाळीस वर्षीय आणि अल्तमश कॉलनी येथील ३५ वर्षीय तरुणासह मालेगाव येथील एकाचा समावेश आहे. (NIA) जालना येथील तरूणाच्या वडीलांचा कातड्याचा व्यवसाय आहे. गेल्या काही महिन्यापासून हा तरुण पाकिस्तानातील `जैश ए मोहंमद` संघटनेच्या हँडलरच्या संपर्कात असल्याची शंका पथकांना होती.
तर शहरातील दोघे जालन्याच्या तरुणाच्या संपर्कात होते. याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. गेल्या चार महिन्यापासून तपास यंत्रणा आणि एनआयए चौघांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. हे चौघेही हाताळत असलेले मोबार्इल देखील एनआएकडून तपासले जात होते. अतिरेकी कारवायांशी यांचा संबंध असल्याचा संशय असल्यामुळे तीन दिवसांपासून एनआयएचे पथक संभाजीनगरात तळ ठोकून होते.
एनआयएच्या पथकाने या कारवाईसाठी दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोबत घेतले होते. रात्री बारा वाजता एटीएस कार्यालयात सर्व पथकांना कारवाईची माहीती देण्यात आली. (Chhatrapati Samhajinagar) यासाठी तिन वेगवेगळी पथके तयार केली गेली. यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश होता. पहाटे तीन वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली.
संशयित राहत असलेल्या किराडपुरा आणि अल्तमश कॉलनी भागात रस्ते बंद करण्यात आले होते. यानंतर सशस्त्र पोलिस पथकांनी आरोपींच्या घरावर छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शहरातील दोघांच्या घरात छापा मारल्यानंतर सुरुवातीला सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर घराची तपासणी करण्यात आली. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर एनआएच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एका तासात चौकशी करुन सोडून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच त्यांना कोणताही त्रास दिलेला नाही, असे व्हिडीओतून वदवून घेतले.
शिक्षकाचा समावेश
पोलिसांनी चौकशी केलेल्या दोघापैकी एकजण मदरसामध्ये शिक्षक असून त्याचे कपड्याचे दुकान आणि अंडी विक्रीचा व्यवसाय आहे. या संशयिताला दोन मुले व तीन मुली आहेत. तर दुसरा कुराणाच्या बुक बायडींगचे काम करतो. त्याला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. पथकाने यांची उशीरापर्यंत चौकशी केली. त्यांच्या बँक खात्याचे डिटेल देखील तपासण्यात आले. यानंतर शहरातील दोघांना नोटीस बजावत सोडून देण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.