Chhatrapati Sambhajinagar : राजकीय नेत्यांनो, जरा सबुरीने घ्या, महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावू नका

Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena's Thackeray party worker and BJP workers clashed: छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी झालेला गोंधळ महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला नक्कीच शोभणारा नाही. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने अशी प्रकरणे पुन्हा घडून नयेत, महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लागू नये, याची काळजी सर्वच पक्षांनी घेण्याची गरज आहे.
Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Shivsena-Bjp-Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

अगदी अलीकडच्या कळापर्यंत राजकारणातील सुसंस्कृतपणासाठी महाराष्ट्र ओळखला जायचा. सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी मर्यादा पाळल्या होत्या. ते एकमेकांचा आदर करायचे. टीका केली तरी त्याला भाषेच्या मर्यादेची जोड निश्चितपणे असायची. गेल्या काही वर्षांपासून चित्र वेगळे दिसत आहे. काही राजकीय नेते सुसाट सुटले आहेत. ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा मोडीत निघण्याची भीती निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी घडलेला प्रकार शांतताप्रेमी नागरिकांच्या मनात चीड निर्माण करणारा आहे. शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि भाजपचे(BJP) कार्यकर्ते समोरासमोर आले आणि एकमेकांना भिडलेही. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विमानतळावर आले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन केले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा पारा चढलाच असणार. त्याचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा मुहूर्त निवडला. आदित्य ठाकरे हे सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपने आंदोलन केले. हे आंदोलन हातघाईवर आले. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
BJP Kishtwar Candidate Shagun Parihar: दहशतवाद्यांकडून वडील अन् काकांची हत्या; भाजपने तिकीट दिलेल्या शगुन परिहार कोण?

बदलापूर अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे. राज्यात महिला, मुली सुरक्षित नसून, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, असा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. जळगाव येथे रविवारी लखपती दीदी कार्यक्रम होता. जळगावला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते. राज्यात महिला, मुली सुरक्षित नसताना पंतप्रधान अशा कार्यक्रमाला कसे जाऊ शकतात, या भूमिकेतून ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात निषेध आंदोलन केले होते.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Yogi Aditynath : 'बटेंगे तो कटेंगे, ; मुख्यमंत्री योगींना सतावू लागली भीती...

बदलापूर प्रकरण हाताळण्यात सत्ताधाऱ्यांना सपशेल अपयश आले, अशी विरोधकांची भूमिका आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित चिमुकल्या मुलींच्या पालकांना दोन दिवस 12-12 तास पोलिस ठाण्यात बसवून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा संदेश समाजात गेला. चिमुकल्या मुलींवर ज्या शाळेत अत्याचार झाले, ती शाळा एका राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याची आहे. त्यामुळे तर पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली असेल, अशीही भावना समाजात निर्माण झाली. त्यामुळे बदलापूर येथील नागरिक रस्त्यावर उतरले. प्रचंड गोंधळ झाला. दगडफेक झाली. शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पत्रकाराशी बोलताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली. हे आंदोलन करण्यासाठी विरोधकांनी बाहेरून माणसे पाठवली होती, अशी विधाने सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी केली.

या सगळ्यांचा राग लोकांच्या मनात होताच. मग सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची, सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीला आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, हे लोकांच्या मनावर बिंबवण्याची संधी विरोधक कशी सोडणार? त्यातूनच ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निषेध आंदोलन केले. त्याला उत्तर देताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला विरोधासाठी आंदोलन केले. यानिमित्ताने दिशा सॅलियन प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढण्यात आले. दिशा सॅलियान यांच्या आत्महत्येला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray )जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने करत आहेत. त्यामुळेच आजच्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी दिशा सॅलियनचे पोस्टर हातात घेतले होते. महिला अत्याचारावर बोलण्याचा अधिकार ठाकरे गटाला नाही, असा संदेश त्याद्वारे त्यांना द्यायचा होता.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Rape Case in Maharashtra : कायद्याचं बोला अन् नराधमांना शिक्षा द्या!

या प्रकारातून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागले. असे काही होणार आहे, याचा अंदाज आल्यामुळे आदित्य ठाकरे थांबलेल्या जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी थोडाही गाफीलपणा केला असता तर अनर्थ घडला असता, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. असे असले तरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकारला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले आहे, असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या पक्षांच्या फोडाफोडीमुळे राजकीय पक्षांमध्ये टोकाचा वैरभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे असे प्रकार वारंवार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकार टाळण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन नेते, कार्यकर्त्यांना आवर घालण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com