Kalyan Kale, Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : जालन्यात काळे रिलॅक्स, तर दानवेंना टेन्शन?

Kalyan Kale and Raosaheb Danve : दानवे विजयाचा षटकार ठोकतात की काळे त्यांचा झेल सीमा रेषेतच घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या जालना मतदारसंघात 70 टक्के मतदान झाल्यानंतरही ठामपणे गुलाल कोणाच्या माथी लागणार? याचा अंदाज अजूनही काळे-दानवे यांच्या समर्थकांना येत नाहीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना मतदारसंघात विजयचा षटकार मारून इतिहास नोंदवायचा आहे. तर काळे त्यांचा षटकारासाठी टोलावलेला चेंडू सीमा रेषेच्या आत झेलून त्यांना पॅव्हेलियन मध्ये पाठवण्याच्या प्रयत्नात.

निवडणुक प्रचारा दरम्यान, रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांना विकासाच्या मुद्यावर लढा असे आव्हान दिले होते. यासाठी एकाच व्यासपीठावर आमने-सामने येण्याची तयारी दानवे यांनी दाखवली होती. परंतु याच विकासाच्या मुद्याचा दाखला देत काळे यांच्यासह काँग्रेसच्या नाना पटोले, विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख या नेत्यांनी पाणी, शेतकऱ्यांना दहा वर्षात न मिळालेल्या विहिरी हे मुद्दे पुढे करत डाव त्यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी सलग पाचवेळा विजय मिळवल्यामुळे त्यांच्या विरोधात सुप्त लाट होती, मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांच्या विरोधात गेला याचा परिणाम मतपेटीवर झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. यापुर्वी ज्या विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना सातत्याने मताधिक्य दिले, ते सिल्लोड-सोयगाव, बदनापूर, पैठण हे मतदारसंघ यावेळी पिछाडीवर पडले अशी चर्चा जिल्ह्यात होताना दिसते आहे.

मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या या मतदारसंघात महायुतीच्या विरोधातील रोष महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. कल्याण काळे(Kalyan Kale ) यांच्या उमेदवारीनंतर दानवे-काळे यांच्यात झालेल्या 2009 च्या लढतीचा उल्लेख वारंवार करण्यात आला. यावर रावसाहेब दानवे यांनी आता ती जुनी परिस्थिती राहिली नाही, भाजप पक्षही बदलल्याचे सांगत काळेंचे आव्हान नाकारले होते.

परंतु मतदानानंतर काळे यांनी दानवेंना 2009 पेक्षा तगडे आव्हान 2024 मध्ये दिल्याची चर्चा मतदारसंघात होताना दिसते आहे. सोशल मिडियावर दानवे-काळे यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे आणि मताधिक्याचा आकडा सांगितला जात आहे. यावर कल्याण काळे रिलॅक्स तर दानवे टेन्शनमध्ये असल्याचे बोलले जाते.

मराठा आरक्षणाचा(Maratha Reservation) सर्वात मोठा प्रभाव असलेल्या मराठवाड्यातील आठही लोकसभेच्या जागांबद्दल छातीठोकपणे कोणीही जय-पराजयाचा दावा करण्यास धजावत नाहीये. जालन्यातील लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतांना दानवे विजयाचा षटकार ठोकतात की काळे त्यांचा झेल सीमा रेषेतच घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT