कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. असे असले तरी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याचा बॉम्ब त्यांनी टाकला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. (Karuna Sharma News)
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, माझा निवडणूक लढण्याचा कोणताही विचार नव्हता. एक महिन्यांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अनेक लोक, उमेदवार भेटले. निवडणुकीला मी उभे राहावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. राज्यात आज एवढे पक्ष असून, आणि 13 कोटी जनता आहे. एवढा भ्रष्टाचार सुरु असूनही कुणी आवाज उठवत नाही. परमबीरसिंह यांच्यासारख्या व्यक्तीला देश सोडून जावं लागलं. मी आवाज उठवला असून, निवडणुकीला उभे राहण्याचा मला अधिकार आहे. आपण आत्ता सत्तेत आलो तर काय वाईट आहे, असे माझी टीम सांगत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये तर नवरा विरुद्ध बायको लढत होणार आहे. संपूर्ण जगात याची चर्चा होणार आहे. धनजंय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशीच लढत होणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर त्या थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी जाहीर केले होते. या निवडणुकांमध्ये शिवशक्ती पक्षाचे उमेदवार मैदानात असतील. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून होणार आहे. कोल्हापूर उत्तरमधून स्वत: मैदानात उतरण्याची घोषणा करुणा शर्मांनी केली आहे. शर्मा यांच्या या घोषणेने मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शिवशक्ती या पक्षाच्या प्रसारासाठी करुणा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली होती. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळातील वाटचाल याबाबत त्यांनी जाहीर घोषणा केली होती. मी काही करु शकणार नाही, असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाच आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा असून, त्यांना माझा अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.