K. Chandrashekar Rao,BRS News Sarkarnama
मराठवाडा

KCR News Marathwada : खरंच केसीआर मराठवाड्यातून लोकसभा लढवणार ?

K.Chandrashekahr Rao : बीआरएसने मराठवाड्यात हवा निर्माण केली आहे, त्याचे रुपांतर निवडणुकीच्या काळात वादळात होते का?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीसीआर या पक्षाने नांदेड मार्गे महाराष्ट्रातील राजकारणात उडी घेतली आहे. (KCR of BRS really contest Lok Sabha from Marathwada?) अबकी बार किसान सरकार असा नारा देत त्यांनी तेलंगणात आम्ही जे शेतकऱ्यांसाठी करून दाखवलं, ते तुम्ही करा, आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, असे खुले आव्हान राज्यातील राज्यकर्त्यांना दिले आहे. यावर तेलंगणा माॅडेल छोटे राज्य असल्याने तिथे यशस्वी ठरले, महाराष्ट्रात ते शक्य नाही, असा सूर सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील काढला आहे.

केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांची अशी कोंडी केल्यानंतर आणखी जोमाने पक्षवाढीची मोहिम हाती घेतली आहे. एवढचे नाही तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) चक्क लोकसभा मराठवाड्यातील (Nanded) नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगरमधून लढणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. बीआरएसने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे.

शहरी भागात आपल्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही हे ओळखून केसीआर आणि त्यांच्या पक्षाने ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. अगदी पत्रक, पोस्टर, तेंलगणा माॅडलची माहिती पुस्तिका, गुलाबी रुमाल असे भरगच्च प्रचार साहित्य गाड्याभरून (Marathwada) मराठवाड्यात पाठवले जात आहे. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले असले तरी बीआरएसची हवा निर्माण करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठे बॅनर लावून जाहीरात देखील केली जात आहे.

कांद्याच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देत इथला कांदा चांगल्या भावात तेलंगणाता खरेदी करण्याची तयारी दर्शवत बीआरएसने शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यात यश मिळवले आहे. एकंदरित बीआरएस शेतकऱ्यांच्या नावाने राज्यात विशेषतः मराठवाड्यात आपले राजकीय बस्तान बांधू पाहत आहे. त्यासाठीची पुर्व तयारी म्हणून त्यांनी सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या पण अडगळीत पडलेल्या, ज्यांचा संपर्क चांगला आहे, शेतकरी चळवळीत काम केले आहे, अशा नेते, पदाधिकाऱ्यांची फळी उभी केली आहे.

आगामी जिल्हा परिषदेत बीआरएस मोठ्या ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. त्यासोबतच लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही बीआरएस नशिब आजमावणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीची सगळी सुत्र ही केसीआर आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील विश्वासू सहकारी हलवत आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसा मोठ्या प्रमाणात निधी देखील मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पक्षासाठी खर्च केला जाणार आहे.

तेलंगणाला लागून असलेल्या नांदेड किंवा मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून केसीआर स्वतः लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. तसे झाले तर केसीआर निवडून आले नाही, तरी ग्रामीण भागातून शेतकरी वर्गाची मते मोठ्या प्रमाणात घेवू शकतात. यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवाराचे विजयाचे गणित निश्चितच बिघडू शकते.

नांदेड मार्गेच महाराष्ट्रात आलेल्या हैदराबादच्या एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून हिणवले जाते. बीआरएसकडे देखील त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. त्यामुळे बीआरएसने मराठवाड्यात हवा निर्माण केली आहे, त्याचे रुपांतर निवडणुकीच्या काळात वादळात होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT