Shivsena News, Aurangabad
Shivsena News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : दानवेंना नको असलेल्या सुदाममामांना खैरेंनी पुन्हा शिवसेनेत आणले..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : शिवसेनेचे माजी महापौर पण नंतर काॅंग्रेस, मनसेत गेलेले सुदाम सोनवणे यांनी आज पुन्हा घरवापसी केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुदाम सोनवणे (Sudam Sonawane) यांना पक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खैरेंनीच सोनवणे यांना शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे सोनवणे यांच्या घरवापसीला सिडको-हडको परिसरातील निष्ठावंत शिवसैनिकांचा विरोध होता. त्यामुळेच हा प्रवेश लांबला होता.

शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्याकडे हडको भागातील शिवसैनिकांनी सोनवणे यांना पुन्हा पक्षात घेवू नका, अशी मागणी केली होती. दानवेंची देखील तीच इच्छा होती, असे बोलले जाते. परंतु चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना सोनवणे पुन्हा शिवसेनेत हवे होते. अखेर खैरेंनी आज त्यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. सुदाम सोनवणे हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून तेव्हा ओळखले जायचे.

त्यामुळे २००५ मध्ये नारायण राणे यांची जेव्हा शिवसेनेतून हकालपट्टी झाली, तेव्हा त्यांच्यापाठोपाठ सुदाम सोनवणे यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करत राणेंची साथ दिली होती. दरम्यान, राणे हेच काही काळ राजकारणात अडगळीत पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुदाम सोनवणे नव्या घरोब्याच्या शोधात होते. आॅगस्ट २०१८ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा झाला, तेव्हा सुदाम सोनवणे यांनी मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राज ठाकरे यांनी त्यांना हाॅटेलमध्ये बोलवून घेत त्यांना पक्षात प्रवेश दिला होता. टीव्ही सेंटर मैदानावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेवून आपला मोठा प्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा सोनवणे यांनी तेव्हा केला होता. यावेळी माजी महापौर सोनवणे यांचा मनसेत प्रवेश असा उल्लेख झाल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढत शिवसेनेचा आणि सोनवणे यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर पुन्हा सोनवणे अडगळीत पडले आणि त्यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात देखील ते गेल्यावर्षी गुलमंडीवर दिसले होते. त्यामुळे त्यांच्या घरवापसीचे संकेत मिळत होते. परंतु सिडको-हडकोतील शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता, अखेर आज तो झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT