Raosaheb Danve, Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

Jalna Assembly Election 2024 : खोतकर-गोरंट्याल पुन्हा भिडणार ? दानवे युतीधर्म पाळणार की मैत्री जपणार ?

Khotkar-Gorantyal will clash again? Attention to the role of danve : अशावेळी जालना विधानसभेचे मैदान पुन्हा मारायचे असेल तर खोतकरांना सत्तारांची साथ घ्यावी लागणार आहे. सत्तार-खोतकर यांची मैत्री असल्याने ते भाजपच्या भरवशावर राहणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

Jagdish Pansare

Congress-Shivsena Political News : विधानसभा निवडणुकीचा धामधूम सुरू झाली तशी विद्यमान आमदार आणि विरोधी पक्षाची इच्छुक झपाटून कामाला लागले आहेत. मराठवाड्यातील स्टील इंडस्ट्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात 2024 मध्येही शिवसेनेचे माजीमंत्री अर्जून खोतकर आणि काँग्रसेचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात पारंपारिक लढत होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून आलेले भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवेंचा पराभव झाला.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने म्हणजे अर्जून खोतकर यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप आहे. लोकसभा निवडणुक निकालानंतर अर्जून खोतकर यांच्या काही आॅडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा संशय अधिक बळावला होता. अशावेळी रावसाहेब दानवे विधासभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत अर्जून खोतकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, की मग काँग्रसेचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी असलेली मैत्री जपणार ? अशी चर्चा जालन्यात सुरू आहे.

खोतकर-गोरंट्याल महाविद्यालयीन काळापासूनचे मित्र, पण राजकारणात ते ऐकमेकांचे शत्रू बनले. संधी मिळेल तेव्हा दोघे ऐकमेकांवर तुटून पडतात. 1999 पासून जालन्याची आमदारकी आलटून पालटून या दोघांकडे राहिली आहे. पंचवीस वर्षात कैलास गोरंट्याल तीन वेळा तर अर्जून खोतकर दोन वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. दोघांचीही मतदारसंघावर तेवढीच पकड आणि ऐकमेकाना टशन देण्याची क्षमता सारखीच.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्जून खोतकरांनी जड अंतकरणाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रामनगर साखर कारखाना खरेदी-विक्री प्रकरणात खोतकरांना थेट ईडीची नोटीस आली होती. (Jalna) यामागे रावसाहेब दानवे यांचेच कटकारस्थान होते, असा जाहीर आरोप तेव्हा खोतकरांनी केला होता. त्यामुळे राज्यात महायुती असली तरी जालना जिल्ह्यात दानवे-खोतकर यांची तोंड विरुद्ध दिशेला आहेत. त्या दानवे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत, त्यामुळे खोतकर सावध पावले टाकत आहेत.

2019 मध्ये अर्जून खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता. पण विधानसभा निवडणुकीत मदतीचा दिलेला शब्द रावसाहेब दानवे यांनी फिरवला आणि खोतकरांना पाडले, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून कायम केला जातो. लोकसभेतील पराभवानंतर रावसाहबे दानवे यांचे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजीमंत्री अर्जून खोतकर या दोघांशी संबंध बिघडले आहेत.

अशावेळी जालना विधानसभेचे मैदान पुन्हा मारायचे असेल तर खोतकरांना सत्तारांची साथ घ्यावी लागणार आहे. सत्तार-खोतकर यांची मैत्री असल्याने ते भाजपच्या भरवशावर राहणार नाहीत, हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे अर्जून खोतकर यांच्या गद्दारीचा बदला घेण्याची इच्छा असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडी असल्याने जालन्याची जागा काँग्रेसला सोडावी लागणार आहे.

खोतकरांशी मैत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना गोरंट्याल यांनीही अंगावर घेतले आहे. तर रावसाहेब दानवे यांच्याशी गोरंट्याल यांची चांगली मैत्री आहे. या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. जालन्यात लढत खोतकर-गोरंट्याल याच्यात होणार असली तरी त्याचे खरे सुत्रधार रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हेच असतील, असे बोलले जाते. आता कोणाचे पारडे भारी ठरते, यावर खोतकरांचे कमबॅक होते, की गोरंट्याल चौथा विजय मिळवतात ? याची उत्सूकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT