Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्य येत्या काळात महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देणारे ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप मोठा फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर राज्यात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. ज्यात राज्यातील मतदाराने महाविकास आघाडीला पसंती दिली, असे मत रावसाहेब दानवेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. (Raosaheb Danve News)
गेल्या काही दिवसापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी नुकतीच एका वृत्तवहिनीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेचीच सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्यात महाराष्ट्राने महाविकास आघाडीलाच सर्वाधिक पसंती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा या निवडणुकीत अधिक फायदा झाला, असल्याचे दानवेंनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदार महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि महायुती अवघ्या 17 जागा मिळाल्या. राज्यात महायुतीमध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतानाही निवडणुकीत बॅकफुटवर यावे लागले.
रावसाहेब दानवे यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीत वाढ झाली आहे. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजकपद देण्यात आले आहे. त्यांचे हे पद राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचे आहे.
त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लासखा लागून राहिले असतानाच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत व्यक्त केलेल्या मतामुळे येत्या काळात भाजपचं नुकसान करीत महाविकास आघाडीला आयतीचं संधी देणारे ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. विशेषतः मराठवाड्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात या मनोज जरांगे फॅक्टरचा फटका मोठया प्रमाणात भाजपला सहन करावा लागला आहे. जालन्यात स्वत: रावसाहेब दानवेंना ही फटका बसला. त्यामुळेच त्यांना या मतदारसंघातून पराभव सहन करावा लागला होता. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी भाजपच्या दानवेंना 1 लाखांहून अधिक मतांनी पराभतू केले.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यातच आता रावसाहेब दानवेंनी केलेले वक्तव्य येत्या काळात महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे दानवेंनी व्यक्त केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.