दत्ता देशमुख
Beed Storage Pond: खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाच्या टेंडरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे व भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने या वादामुळे सर्वसामान्यांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाबाबत मी केलेल्या पाठपुराव्यासंबंधीची फाइल लवकरच सर्वांसमोर ठेवून या योजनेतील मुर्गा कोण, फकीर कोण आणि अंडा कोण खातंय हे सर्वांसमोर उघड करू, असा प्रतिहल्ला सुरेश धसांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर केला.
खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाच्या टेंडरबाबत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर 'मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर' अशी टीका केली होती. त्याला सुरेश धसांनी उत्तर दिले. दिवाळीनंतर खुंटेफळ साठवण तलाव या योजनेबाबतच्या फाइलची सत्यप्रत मागवण्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यानुसार संबंधित दस्तावेज प्राप्त होताच आपण पुन्हा एकदा पाठपुराव्यासंबंधी केलेला पत्रव्यवहार सादर करून वस्तुस्थिती समोर आणणार आहोत, असे धस म्हणाले.
माझ्या पत्रानंतरच कामासंबंधीची फाइल पुढे सरकली
या तलावाच्या सर्वेक्षणापासून ते मंजुरीपर्यंत आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न केलेले असून, आमदार बाळासाहेब आजबे यांनी या कामासाठी काय काय केले, ते सांगावे असे आव्हानही धसांनी दिले. माझ्या पत्रानंतरच या कामासंबंधीची फाइल पुढे सरकली असून, नंतरच कार्यवाही झालेली आहे.
आजबेंनीही त्यांच्याकडील दस्तावेज दाखवावेत व नंतरच याबाबत बोलणे योग्य होईल, असे सांगून... शिंपोरा ते थेट खुंटेफळ साठवण तलावासाठीच्या जलवाहिनीच्या कामाचे टेंडर आ. बाळासाहेब आजबे यांनी.. ईपीसी पद्धतीने टेंडर निघावे, अशी मागणी केली होती. ती रद्द होऊन माझ्या मागणीप्रमाणे या जलवाहिनी कामाचे बी-1 पद्धतीने टेंडर काढण्यात येणार आहे, असेही आमदार धस म्हणाले.