Prakash Abitkar  Sarkarnama
मराठवाडा

Prakash Abitkar : पालकमंत्री कोणावर होणार मेहरबान? भाजपमध्ये मोठी स्पर्धा

Kolhapur BJP News : महामंडळ असो किंवा जिल्ह्यातील अन्य काही समित्यांवरील नियुक्तीत पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांच्या शब्दाला किंमत राहणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने आणि विधान परिषदेवरील संधी हुकल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या नजरा आता महामंडळ आणि समितीच्या निवडीकडे लागल्या आहेत. अधिवेशन संपल्यानंतर या निवडीला आता वेग येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील इच्छुकांची नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याचे काम सुरू आहे. तरी या निवडीमध्ये पालकमंत्री पदाला मोठी किंमत आहे. इच्छुकांमधील कोणत्या नेत्यांवर पालकमंत्री मेहरबान होणार, हे देखील पहावे लागणार आहे. त्यामुळेच महामंडळावर जाऊ इच्छिणाऱ्यांनी तशी तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्येच मोठी चढाओढ आहे. हे पद भाजपकडेच रहाण्याची शक्यता असल्याने त्यासाठी पक्षातील दोन-तीन इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी पद भोगलेल्या आणि काही निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांनीच यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

महामंडळ असो किंवा जिल्ह्यातील अन्य काही समित्यांवरील नियुक्तीत पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांच्या शब्दाला किंमत राहणार आहे. आबिटकर हे शिवसेना-शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला चांगले पद मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. म्हणूनच इच्छुकांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.

२०१९ साली राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यानंतर या पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. तेव्हापासून या पदासह अन्य महामंडळावरील नियुक्त्यांही झालेल्या नाहीत. त्यामुळे विधान परिषदेवर संधी न मिळालेल्या जिल्ह्यातील इच्छुकांनी आता महामंडळावर नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात सध्या महायुतीचे स्पष्ट बहूमत आहे. या युतीत भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचा समावेश आहे. पदांचे वाटप करताना या तिन्हीही पक्षांना प्रतिनिधीत्व मिळेल, असे सूत्र ठरवले जाणार आहे. भाजपकडून दोघांमध्ये देवस्थान समितीसाठी स्पर्धा लागली आहे. तर राष्ट्रवादीतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याने या पदावर दावा केला आहे. देवस्थान समिती जिल्ह्यात महत्त्वाचे असल्याने तिन्ही पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना यात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचा पदभर आपल्याकडे राहण्यासाठी नेत्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. तु

यापूर्वी कोल्हापूरला म्हाडा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राज्य नियोजन मंडळ प्रमुख महामंडळावर पदाचे स्थान मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या वाट्याला एकदा कोणते महामंडळ येईल? या महामंडळावर आपली कशी वर्णी लागेल? याची बेजमी पदाधिकाऱ्याकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT