Kundlik Khande Join Shivsena UBT News Beed Sarkarnama
मराठवाडा

Kundlik Khande Join Shivsena UBT : 'चूक झाली असेल तर माफ करा' म्हणत कुंडलिक खांडेनी घेतली पुन्हा शिवसेनेची मशाल हाती!

Beed Local Body Election 2025 : गेल्या काही वर्षांपासून राजकीय वर्तुळात वारंवार पक्षांतरांमुळे चर्चेत असलेले कुंडलिक खांडे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.

Jagdish Pansare

  1. बीडचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत घरवापसी केली आहे.

  2. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला, ज्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल अपेक्षित आहे.

  3. खांडे यांनी सांगितले की त्यांचे मन सदैव शिवसेनेशी जोडलेले होते आणि ते पुन्हा जुन्या सहकाऱ्यांसोबत काम करणार आहेत.

Beed Political News : गुटखा तस्करी प्रकरणात आरोप, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याच्या कारणावरून जिल्हाप्रमुख पद आणि पक्षातून हाकालपट्टी झालेले कुंडलिक खांडे यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सगळ्याच पक्षात वेगवान घडामोडी सुरू आहेत. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेनाही मागे नाही. कुंडलिक खांडे यांनी आज मुंबईत आपल्या समर्थकांसह हाती शिवबंधन बांधून घेतले. 'चूक झाली असेल तर माफ करा' असे म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत खांडे यांच्या हाती मशाल सोपवली आहे.

बीड जिल्ह्यात नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सत्ताधारी पक्षातून आऊटगोईंग, इनकमिंग सुरू आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हाकालपट्टी केलेल्या माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने घेतलेला हा निर्णय त्यांना नगर परिषदेत यश मिळवून देतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजकीय वर्तुळात वारंवार पक्षांतरांमुळे चर्चेत असलेले कुंडलिक खांडे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. 11) त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मशाल हाती घेतली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खांडे यांच्याकडे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखपद होते. मात्र, पुढील काळात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

मागील विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु उमेदवारी अनिल जगताप यांना मिळाल्याने खांडेंनी बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी पुन्हा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत पुनरागमन केले आहे. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

22 वर्षांपासून मी शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. मागील काळात काही कारणांमुळे मला जिल्हाप्रमुख पदावरून कमी करण्यात आले. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. आता अंबादास दानवेंच्या नेतृत्वात पुन्हा जोमाने कामाला लागून बीड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवू, असा विश्वास पक्षप्रवेशावेळी खांडे यांनी व्यक्त केला.

कोण आहे कुंडलिक खांडे?

बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख असलेल्या कुडलिंक खांडे यांचे नाव आल्यानंतर त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. राज्यात गुटखाबंदी असताना अंदाजे 35 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बीड इमामपूर रोडवर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा पोलिसांना सापडला होता. विविध नाव असलेला गुटखा, टेम्पो, एक मोबाईल असा एकूण 32 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सुरू असताना त्याठिकाणी हजर असलेल्या महिलेस पोलिसांनी या मालाबाबत विचारपूस केली. तेव्हा तिने हा माल तिचे पती वसीम शेख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याची माहिती दिली होती.

या दोन्ही कारवाई नंतर पोलिसांनी केज पोलीस स्थानकांत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले. गुन्हा क्रमांक 553/21 मध्ये चंद्रकांत कानडे, महारुद्र मुळे, शेख वासिम आणि कुंडलिक खाडे यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 328, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. इमामपूर रोडवरील गोदामावर घातलेल्या छाप्यात थेट शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा संबंध असल्याचा पोलिसांनी दावा करत त्यांचे नाव आरोपीच्या रकान्यात टाकले. गुटखा प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

FAQs

1. कुंडलिक खांडे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
कुंडलिक खांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे.

2. हा पक्षप्रवेश कुठे झाला?
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

3. बीड जिल्ह्यात या प्रवेशाचा काय परिणाम होणार आहे?
या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला बीडमध्ये बळकटी मिळणार असून, स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलू शकतात.

4. कुंडलिक खांडे पूर्वी कोणत्या पदावर होते?
ते बीड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते.

5. खांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी सांगितले की, "माझं मन नेहमी शिवसेनेतच होतं, आता पुन्हा आपल्या घरात परतलो आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT