Maharashtra women scheme : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ सरसकट सर्व पात्र महिलांना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने जालना जिल्ह्यात अनोखे आंदोलन केले. घनसांगवी तालुक्यातील युवक तालुकाध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी साडी-चोळी परिधान करून 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आयोजित शिबिरात प्रवेश करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शिबिरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घोगरे यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने (Maharashtra Government) 'माझी लाडकी बहीण' योजनेतील सुमारे 92 लाख लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळली आहेत. ई-केवायसी न करणे, वार्षिक उत्पन्नाची अट पूर्ण न होणे आणि इतर अपात्रतेच्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ई-केवायसी न झाल्यामुळेच सुमारे 62 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जाते.
विदर्भ आणि मराठवाड्यात माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Scheme) योजनेच्या ई-केवायसीच्या अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि आंदोलने केली. मात्र त्यानंतरही अनेक महिलांचे लाभ पुन्हा सुरू झाले नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर घनसांगवी येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानात रामभाऊ घोगरे यांनी साडी-चोळी घालून प्रवेश केला. प्रशासनाला निवेदन देत त्यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना पुन्हा सरसकट लाभ देण्याची मागणी केली.
घोगरे यांनी सांगितले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले होते. मात्र त्यानंतर विविध अटी आणि निर्बंध लागू करून अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ घनसांगवी तालुक्यातच सुमारे 45 हजारांहून अधिक महिलांचा लाभ थांबला आहे.
"महिलांना पुन्हा सरसकट लाभ मिळावा, यासाठीच साडी-चोळी परिधान करून आंदोलन केले. प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी गेलो असता आम्हाला अडवण्यात आले. महिलांचा लाभ पुन्हा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील," असा इशाराही घोगरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.