Latur News : राज्यातील सर्वच जिल्हयात भाजपमधील अंतर्गत संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. लातूर जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, आता भाजपचा बाल्लेकिल्ला अशी ओळख झाली आहे. लातूर शहरातील एकमेव आमदार काँग्रेसचे आहेत तर उर्वरित पाच आमदार महायुतीचे असून त्यामध्ये तीन आमदार भाजपचे आहेत.
त्यातच आता आगामी काळात लातूर महापालिका व जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणूका होणार असल्याने या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपद, भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस दिसून येत आहे.
येत्या काळात लवकरच भाजपमधील (BJP) निवडी होण्याची शक्यता गृहीत धरून इच्छुक मंडळीमध्ये या पदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसात लातूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात या दोन्ही पदासाठी मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी इच्छुक असले तरी पक्षश्रेष्ठी याबद्दल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदासाठी एकेकाळचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh hake) हे इच्छुक आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून गणेश हाके यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करून हे पद दिले जाणार का याची उत्सुकता लागली आहे. २०१९ च्या निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवलेले दिलीप देशमुख यांना भाजपने ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देऊ केले होते. त्यानुसारच आता यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांना दिलीप देशमुख यांच्याप्रमाणे तोच न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पदासाठी आता गणेश हाके यांच्याशिवाय लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते रामचंद्र तिरुके, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार समर्थक भीमाशंकर राचट्टे, संतोष मुक्ता, भारत चामे यांची नावे चर्चेत आहेत.
लातूरचे माजी उपमहापौर देविदास काळे हे सध्या भाजप शहर जिल्हाध्यक्ष आहेत. दुसरीकडे भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या व लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांचे शहर जिल्हाध्यक्षपदी नाव चर्चेत आहे. याशिवाय विवेक वाजपाई, शैलेश लाहोटी, शिवा शिसोदिया, शैलेश गोजमगुंडे, रागिणी यादव यांची देखील नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी याबद्दल काय निर्णय? घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हयात सध्या माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अभिमन्यू पवार व रमेश कराड हे तीन आमदार आहेत. त्यामुळे या दोन पदाच्या निवडीवेळी या तीन पैकी कोणत्या आमदाराचे वर्चस्व असणार याकडे लक्ष लागले आहे. त्याशिवाय येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या निवडी महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या पदासाठी मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.