Latur BJP Politics : संभाजी पाटील निलंगेकर आणि लातूर जिल्ह्यातील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांच्यातील सामना निलंग्यात रंगला. नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी देशमुखांनी सगळे हातखंडे वापरले. निलंग्यात येवून संभाजी पाटलांना आव्हान दिले, पण निलंगेकरांनी लातूरच्या देशमुखांना नाकारलेच. काँग्रसेच्या नगरसेवकांची संख्या नगरपरिषदेत वाढली ही भाजपसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. पण नगराध्यक्षपदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत निलंगेकर भावंडांनी गड राखलाच.
लातूरचे पार्सल परत पाठवल्याच्या आनंदात संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता लातूर महापालिकेत कमळ कमळ कमळ.. म्हणत दंड थोपटले आहेत. अमित देशमुख यांनी निलंगा आणि त्यांचे बंधू माजी आमदार धीरज देशमुख यांनी अनुक्रमे निलंगा, रेणापूर नगरपालिकेवर लक्ष केंद्रीत केले होते. पण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला अपयश आले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल हा महायुतीच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. लातूर जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा राहिला, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या भाजपपेक्षा अधिक झाली हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.
निलंग्याचा गड राखल्यानंतर आता लातूर महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावलेली लातूर महापालिका पुन्हा मिळवण्याचे आव्हान कालच्या निकालानंतर संभाजी पाटील यांनी स्वीकारले आहे. भाजपला निलंगा नगरपालिकेसह औसा वगळता घवघवीत यश मिळाले असले तरी इतक्यावरच हूरळून न जाता 'ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है' म्हणत संभाव्य लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अमित देशमुख यांना आव्हान देत शड्डू ठोकला.
काय म्हणते अहमदपूर? काय म्हणते उदगीर काय? रेनापुर काय म्हणते, निलंगा काय म्हणते? असे म्हणत सगळीकडे कमळ फुलले म्हणून आता लातूर महानगरपालिकेत सुद्धा कमळच फुलणार, असा दावा करत उपस्थित कार्यकर्त्यांना संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रोत्साहित केले. निलंगा नगरपालिकेच्या अतिशय चुरशीच्या लढतील भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. 23 पैकी 15 जागा जिंकून नगराध्यक्ष पदाच्या संजय हलगकर यांनी काँग्रेसचा पराभव केला. तर काँग्रेसने गतवेळेपेक्षा संख्या वाढवत काही प्रमाणात टक्कर दिली.
बाभळगाव विरुद्ध निलंगा म्हणजेच देशमुख विरुद्ध निलंगेकर अशा प्रकारच्या झालेल्या या निवडणुकीत निलंगेकरानी संभाजी पाटलांना या निवडणुकीत तारले आहे. निलंगा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप- काँग्रेस यांच्या अटीतटीच्या लढतीत भाजपने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगकर हे 2026 मतांची आघाडी घेत विजयी झाले. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांचा त्यांनी पराभव केला. नगरसेवक पदासाठी भाजपचे 15 तर काँग्रेसचे आठ जण निवडून आले आहेत.
निलंगा नगर परिषद निवडणुकीसाठी अकरा प्रभागातून एक नगराध्यक्ष व 23 नगरसेवक पदासाठी चुरशीची लढत झाली. अमित देशमुख यांनी निलंग्यात दौरे, प्रचार सभा, बैठका घेत भाजपला तगडे आव्हान दिले होते. नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थितीत करत परिवर्तानासाठी सादही घातली. पण जे लातूरलाच वेळ देत नाही, कोणाला भेटत नाही, ते निलंगेकरांची कामे कशी करणार? असा प्रश्न भाजपच्या अर्चना चाकूरकर यांनी एका सभेत केला? यावरही निलंगेकरांनी विचार केल्याचे निकालवरून स्पष्ट होते.
भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्चना पाटील चाकूरकर, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांच्या सभांमुळेही वातावरण भाजपमय झाले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीची सुत्रं हाती घेतली होती. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी भाजपला कडवी झुंज दिली. मागच्या नगरपालिकेतील तुलनेत यावेळी नगरसेवकांची संख्या वाढली हीच काँग्रेससाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच प्रभाग निहाय झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लिंबण महाराज रेशमे यांनी जवळपास दोन हजार 700 मतं घेतली आहेत. उर्वरित चार उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कुमार पाटील यांच्या पत्नीचा अधिक मतांनी पराभव झाला आहे. तर काही उमेदवार दहा व वीस मतांनी निवडून आले आहेत.
मागील चार वर्षापासून नगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे शहरातील नागरी सुविधा, अंतर्गत प्रश्न, स्वच्छता, विकास कामे आदी विषय मोठ्या प्रमाणात विरोधकांनी पुढे करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. परंतु केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर विकास कामासाठी मोठा निधी मिळू शकतो या आशेनेच मतदारांनी पुन्हा भाजपच्या (BJP) हाती सत्ता सोपवली.
काँग्रेसलाही विरोधी भुमिका बजावण्यासाठी मतदारांनी आवश्यक नगरसेवक सभागृहात पाठवले आहेत. अशोक पाटील निलंगेकर सक्रिय नसताना काँग्रेसच्या नगरसेवकांची वाढलेली संख्या पाहता काँग्रेस (Congress) भविष्यात आशा बाळगून असेल हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.