Latur ZP election News : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत बहुमतासह सत्ता मिळवली. तर भाजपला 22 जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीच्या बळावलेला दिसतो. त्यामुळे काँग्रेस कडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे भाजप मात्र सावध पावित्रा घेत युतीसाठी पुढाकार घेण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसते.
महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी (ता. 21) शेवटचा दिवस असला तरी महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही? हे स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत.
महापालिकेत काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी एकहाती सत्ता आणली. 70 पैकी 43 जागा त्यांनी जिंकल्या. तर त्यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला चार जागा जिंकता आल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील हे दोनही पक्ष एकत्र राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. कार्यकर्तेही गर्दी करू लागले आहेत. बाभळगाव येथे येऊन जिल्हाभरातील इच्छुक आमदार देशमुख यांची भेट घेताना दिसत आहेत.
प्रत्येकाच्या शिष्टमंडळाला वेळ देऊन देशमुख चर्चा करीत आहेत. गुणवत्तेवर आधारित उमेदवारी अशीच भूमिका त्यांची या निवडणुकीत राहणार असल्याने आपणच कसे सरस उमेदवार आहोत, हे इच्छुक त्यांना पटवून सांगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. या पक्षाकडे इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे.
भाजपला नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाले होते; पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना हे यश टिकवता आले नाही. भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव या निवडणुकीत झाला आहे. तिकीट वाटपातील गोंधळ, अंतर्गत गटबाजी, प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य याचा परिणाम झाला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला हा पक्ष सामोरे जात आहे. पण यावेळेस पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. पक्षात नेते भरपूर आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे दिसत आहे. यातून उमेदवारीदेखील हे नेते जाहीर करताना दिसत आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी महायुतीसाठी हात पुढे केलेला आहे. पण भाजपकडून त्यांना अद्यापपर्यंत प्रतिसाद देण्यात आलेला नाही. महायुती होणार का, हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे देखील तसेच आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना आदी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.