Latur Politics Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics : निंलगेकरांचे फुल, श्रृंगारेची ऑफर अन् आमदार काळेंचा सल्ला देशमुख मनावर घेतील का ?

Jagdish Pansare

Latur Political News : काँग्रेसमध्ये चार दशके राजकारण, दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद, खासदारकी आणि राज्यात, दिल्लीत मानाचे स्थान मिळाल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला. भाजपची विचारधारा, हिंदुराष्ट्राची संकल्पना यावर सातत्याने टीका करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी त्याच भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य नाही, हे राज्यातील गेल्या साडेचार वर्षाच्या वाटचालीवरून सिद्ध झाले आहे. (Latur Politics)

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर मराठवाड्याच्या राजकारणातील आणखी एक घराणे गढीचे देशमुख हे भाजपवासी होणार अशी चर्चा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या दोन सांस्कृतिक कार्यक्रमांमधून या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. लातूर जिल्ह्यात निलंगेकर-देशमुख ही दोन राजकीय घराणी आहेत. ज्यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. दोन्ही घराण्यातील अनुक्रमे शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघांचेही दिल्ली दरबारी मोठे वजन. पण या दोन नेत्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्यांना मात्र आपल्या वडील, आजोबांसारखा करिश्मा दाखवता आलेला नाही. राज्याच्या सत्तेत एखादे मंत्रीपद या पर्यंतच हे घराणे मर्यादित राहीले. विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांची राजकाणात असलेली दोन्ही मुले अमित, धीरज देशमुख यांनी कायम बचावात्मक पावित्रा घेत आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे.

शिवाजी पाटील निलंगेकरांचे चिरंजीव अशोक पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही, पण त्यांना या पक्षात उच्च भरारी घेता आली नाही. दुसरीकडे निलंगेकरांच्या सुनबाई रुपाताई पाटील निलंगेकर, नातू संभाजी पाटील यांनी मात्र काँग्रेसी विचारधारेपासून फारकत घेत भाजपची विचारधारा स्वीकारली.

रुपाताई निलंगेकर खासदार झाल्या, त्यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार व फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीही झाले. या इतिहासाची उजळणी यासाठीच कारण आता काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले अमित, धीरज देशमुख या दोन भावांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा घाट नुकताच घालण्यात आला.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केल्यामुळे अमित देशमुख यांनी समयसूचकता दाखवत निलंगेकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याचा योग टाळला. मुहूर्त होता 'व्हॅलेंटाइन डे'चा. निलंगेकर यांनी अमित देशमुख आले असते तर त्यांना देण्यासाठी मी गुलाबाचे फुल आणले होते. प्रेमाचे प्रतिक म्हणून, पण ते आले नाही, आता हे फूल अयोजकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे म्हणत त्यांनी देशमुखांच्या भाजप प्रवेशाला एकप्रकारे हवा देण्याचे काम केले.

देशमुखांनाही भाजपमध्ये येण्याची आॅफर होती का? अशीही चर्चा जिल्ह्यात झाली. निलंगेकरांच्या या प्रेमाला अमित देशमुख यांनी काही उत्तर दिले नाही. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी जेव्हा त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आता भाजपमध्ये आलं पाहिजे, असे म्हणत टाळी दिली, त्याला आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांच्या आॅफरला मात्र खास आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले.

मी जिथे आहे तिथे ठीक आहे, सुखी, समाधानी आनंदी तुम्ही राहा, अशा शब्दात त्यांनी जाहीरपणे महायुतीतील नेत्यांच्या प्रस्ताव नाकारला. कदाचित या गोष्टी सार्वजनिक बोलायच्या नसतात, असा सूचक इशाराच त्यांनी या नेत्यांना दिला, असेही बोलले जाते. काँग्रेसमधील ज्या नेत्याला भाजपमध्ये जायचे असते तो कधीही याबाबत जाहीर वाच्यता करत नाही. किंबहुना अशा चर्चा खोट्याच असल्याचा दावा करतो. अशोक चव्हाण यांच्याबाबतीत हे दिसून आले. त्यामुळे मी इकडेच ठिक आहे, म्हणणारे देशमुख बंधू येणाऱ्या काळात भाजपमध्ये दिसले तर नवल वाटायला नको...

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT