Latur DCC Bank Election Sarkarnama
मराठवाडा

Latur DCC Bank: चार-चार टर्म आमदार,मंत्री राहिले असून लातूर बँक ताब्यात कशी येत नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं

Latur District Bank Election Mahayuti Alliance : चार चार टर्म आमदार, मंत्री राहिलेले असताना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात कशी नाही? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना तयारीला लागा, असे आदेश दिले.

राम काळगे

Mahayuti Alliance : चार चार टर्म आमदार, मंत्री राहिलेले असताना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात कशी नाही? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना तयारीला लागा, असे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात जिल्हा बँकेच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

लातूर जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलून प्रशासक नेमण्याचा भाजपाचा डाव फसला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खात्यांतर्गत असलेल्या प्राधिकरणाने निवडणूक घेण्यास आपली यंत्रणा सक्षम असल्याचे सांगितले आणि त्यानंतर काही दिवसातच आज लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा जिल्हा सहनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकला अशी मागणी भाजपाकडून विशेषता संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून केली जात होती. लातूर जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे काँग्रेस सोबत जाणार असल्याचा आरोपही केला होता.

या सगळ्या घडामोडी सुरू असताना आजच लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर ही निवडणूक महायुती एकत्र लढणार की मग सहकारमंत्री बाबासाहेब पाटील काँग्रेस सोबत जाणार? अशा चर्चांना उधाण आले होते.

मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि वरिष्ठ पातळीवरून वेगवान सूत्रे हलली. भाजपचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या निवासस्थानी रात्री महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची तातडीची बैठक पार पडली.

विशेष म्हणजे या बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार या बैठकीला हजर नसले तरी जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी तेही कामाला लागतील असा निरोप मुख्यमंत्र्यांनी खास करून पाठवल्याची माहिती आहे.

लातूर जिल्हा बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाची सत्ता खेचण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती सहकार पॅनलच्या माध्यमातून सज्ज झाली आहे. बाबासाहेब पाटील आणि संभाजी पाटील निलंगेकर यांना एकत्र बसायला लावून आपापसातील वाद मिटवून जिल्हा बँक ताब्यात घ्या, असे आदेशच राज्याच्या प्रमुख नेतृत्वाने दिले आहेत.

रमेश कराड यांच्याकडे नेतृत्व?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा पराभव करत भाजपच्या रमेश आप्पा कराड यांनी बाजी मारली. या विजयानंतर लातूर जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीची धुरा रमेश कराड यांच्याकडे सोपवल्याची चर्चा त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सुरू झाली आहे. रमेशआप्पा कराड यांच्या पुढाकारातून महायुतीतील नेत्यांची मजबूत मोट बांधून सत्ताधारी काँग्रेसच्या विरुद्ध या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून बांधण्यात आल्याचे चित्र आहे.

कराड यांच्या प्रयाग या निवासस्थानी सोमवारी झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत बँकेच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा होऊन सत्ताधारी काँग्रेसच्या विरुद्ध ताकतीने महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला. कराड यांनी अचानक तातडीने आयोजित केलेल्या या बैठकीस महायुतीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार बसवराज पाटील मुरूमकर, माजी मंत्री संजय बनसोडे, विक्रम काळे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश भाजपाचे गणेश हाके, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार त्रिंबकनाना भिसे यांची उपस्थिती होती. आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील आणि माजी आमदार दिनकरराव माने हे दूरध्वनीवरून बैठकीत सहभागी झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून महायुती पूर्ण ताकतीने उतरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष...

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याचे चर्चिले जात आहे. या निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी भरण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये माहायुतीतील आमदार आपल्या मतदारसंघात अनेक टर्मपासून आमदार म्हणून आहेत, परंतु त्यांना जिल्हा बँक ताब्यात घेता आली नाही.

आता पूर्ण ताकदीनं ही बँक ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागा असा संदेश मुख्यमंत्री निधीची माहिती आहे. उमेदवारीच्या निर्णयाबाबत कोअरकमिटी कोणत्या तालुक्यातून कोणता उमेदवार सक्षम राहील? याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजतं. आमदार रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.

SCROLL FOR NEXT