Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलने १९ पैकी पंधरा जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी परिवर्तन पॅनलच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. अरविंद पाटील निलंगेकर यांनीही निलंगा सोसायटी मतदारसंघातून आपल्या काकू सहकार पॅनलच्या संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव करत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. आम्ही काँग्रेसच्या कारभारावर अंकूश ठेवू, असे सांगत निलंगेकर यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली. तर मतदारांनी संधी दिलीय, आता जिल्हा बँकेत संचालक म्हणून चांगलं काम करा, असा सल्ला वजा चिमटा धीरज देशमुख यांनी निलंगेकरांना काढला.
गेल्या कित्येक वर्षापासून लातूर जिल्हा बँकेवर देशमुख कुटुंबाची सत्ता आहे. या सत्तेला सुरूंग लावून बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अनेकदा केला, पण यात त्यांना यश आले नाही. या वेळच्या संचालक मंडळात अरविंद पाटील निलंगेकर हे असणार आहेत.
काँग्रेसच्या जिल्हा बँकेतील कारभारावर सातत्याने टीका आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत रोज एक प्रश्न उपस्थित करणारे अरविंद पाटील निलंगेकर आता स्वतः जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे भविष्यात देशमुख विरुद्ध निलंगेकर यांच्यातील संघर्षाचा नवा अंक जिल्हा बँकेच्या राजकारणातही पाहायला मिळणार आहे.
हा संघर्ष होईल तेव्हा होईल, परंतू तुर्तास धीरज देशमुख यांनी विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत अरविंद पाटील निलंगेकर यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधकांनाही मतदारांनी संधी दिली आहे. अरविंद पाटील यांना मतदारांनी संधी दिली आहे, आता त्यांनी संचालक म्हणून त्यांना मिळालेल्या संधीचे शेतकरी, सभासद, मतदारांच्या प्रश्नांसाठी सोनं करावं, असा सल्ला दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीने सहकार पॅनलच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला, त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले.
लातूरची जनता, सभासद, सर्व मतदारांचे आभार. सहकार पॅनलला पु्न्हा एकहाती सत्ता देऊन त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी दिली. सहकारामध्ये आम्ही केलेले काम डोळ्यासमोर ठेवून आम्हाला मतदान केले. विरोधकांनाही जी काही संधी मिळाली त्यातून त्यांनीही चांगले काम करावे. येणाऱ्या काळात काम करण्यासाठी आम्ही नवे चेहरे घेऊन नव्या संचालक मंडळात काम करू.सहकाराची निवडणूक ही राजकीय पक्षांची नसते, असे स्पष्ट करतानाच विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता आम्ही केलेल्या कामाच्या बळावर मतदारांना साद घातली. अरविंद पाटील निलंगेकर यांचेही मी अभिनंदन करतो, त्यांनी त्यांच्या भागातील लोकांचे प्रश्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोडवावेत, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे धीरज देशमुख म्हणाले.
आमचं काम लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे, विरोधकांच्या टीकेला आम्ही आमच्या कामातून उत्तर दिलं. सर्वजण एकत्र मिळून आम्ही काम करू. सहकारातील निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूका नसतात. जिल्हा बँकेच्या माध्यमातून गरजू लोक, शेतकरी पुढे गेले पाहिजे, या दृष्टीने आम्ही काम करू, अशी ग्वाही देखील धीरज देशमुख यांनी आपल्या विजयी प्रतिक्रियेतून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.