

Beed NCP Politics : राजकारणात दिलेला शब्द नेहमी पाळलाच जातो असे नाही, अर्थात तडजोडीचे स्वरूप कसे आहे? यावर सगळी गणित अवलंबून असतात. राज्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात काका-पुतण्याचे राजकारण कायम चर्चेत राहिले आहे. अगदी देश, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर अनेक ठिकाणी काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष लोकांनी अनुभवला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात अशाच एका काका-पुतण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
2029 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची प्रकाश सोळंके यांची घोषणा; पुतणे जयसिंह यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे केले. 2024 मध्येही अशीच घोषणा करून ऐनवेळी स्वतःच निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी तरी काका राजकीय शब्द पाळणार का, याची माजलगावमध्ये चर्चा. प्रकाश सोळंके यांनी या मतदारसंघातून पाचवेळा निवडणूक लढवली आणि चारवेळा जिंकली. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती.
पुतणे जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारस घोषित करत त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले. परंतु काही दिवसातच त्यांनी स्वतःचा निर्णय फिरवला आणि निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. त्यामुळे तेव्हा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या जयसिंह सोळंके यांचा भ्रमनिरास झाला. आता रविवारी एका जाहीर कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांनी येणाऱ्या 2029 च्या विधानसभेत आपण उमेदवार राहणार नाही. तर पुतणे जयसिंह सोळंके हे निवडणूक लढवतील असे जाहीर केले.
सध्या तरी त्यांचे समर्थक या घोषणेकडे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची रिकॅप म्हणून पाहत आहेत. पण यामुळे पुतणे जयसिंह व त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. आता प्रकाश सोळंके यांची घोषणाही पुतण्याला लिफ्ट करण्यासाठी आहे, की ती पुन्हा एकदा धप्पा ठरते, हे येणारा काळच ठरवेल. पाच निवडणुका, चार विजय मिळवलेल्या प्रकाश सोळंके यांना कायमच मंत्रीपदाची आशा राहिली आहे. परंतु त्यांच्या नावाचा विचार पक्ष नेतृत्वाने कधी केलाच नाही.
यातूनच बीड जिल्ह्यातील मंत्रीपद हे विशिष्ट वर्गासाठी राखीव आहे का? असा उद्विग्न सवाल सोळंके यांनी नुकताच केला होता. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल पाहता धनंजय मुंडे यांच्या वापसीची चर्चा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश सोळंके यांनी मंत्रीपदाबाबत वरील विधान केले होते. आता थेट त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आता हे मंत्रिपदासाठीचे दबावतंत्र आहे? की मग खरचं पुतण्याला संधी देण्याचा काका प्रकाश सोळंके यांचा निर्णय? हे पाहण्यासाठी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.
माजलगावच्या राजकारणात सोळंके कुटुंबाला मोठी राजकीय परंपरा आहे. माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सहकार, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुंदरराव सोळंके यांच्या राजकीय वारशाची धुरा पुढे प्रकाश सोळंके यांनी सांभाळली. वडिलांच्या राजकीय संपर्काचा आणि सहकार क्षेत्रातील मजबूत जनाधाराचा फायदा त्यांना झाला. मात्र, केवळ कौटुंबिक वारशावर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःची राजकीय ताकद निर्माण केली.
माजलगाव विधानसभा मतदारसंघासह सहकार क्षेत्रातही सोळंके कुटुंबाचा प्रभाव आजही कायम आहे. सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना हा या राजकीय प्रभावाचा महत्त्वाचा आधार मानला जातो. प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून सुरू झाली. पंचायत समितीच्या राजकारणापासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद आणि विधानसभा राजकारणात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. प्रारंभी त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून १९९९ मध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे भाजपच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत केली.
२००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक जिंकली. या काळात त्यांना राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महसूल आणि पुनर्वसन यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आर. टी. देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, 2019 मध्ये त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी भाजपच्या रमेश कोकाटे यांचा पराभव केला. 2019ची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, पुढील पाच वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली आणि 2024 मध्येही तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
पक्ष फुटीनंतर अजित पवारांना साथ..
प्रकाश सोळंके यांच्या राजकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवारीवर विजय मिळवला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मोहन जगताप यांनी त्यांना कडवी लढत दिली. प्रकाश सोळंके यांचा विजय केवळ 5 हजार 899 मतांनी झाला.
मराठा आरक्षण आंदोलनात प्रकाश सोळंके (Prakash Solnke) यांच्या घरावर हल्ला होऊन ते जाळण्यात आले होते. याची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी त्यांचे जिल्ह्यातील नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले मतभेद लपून राहिलेले नाहीत. धनंजय मुंडे माझा नेता नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश सोळंके यांनी नुकतीच एका मुलाखतीत जाहीर केली होती. आता प्रकृतीमुळे प्रकाश सोळंके हे पुतण्या जयसिंह याला आपला राजकीय वारस घोषित करून स्वतः राजकारणातून बाजूला होण्याच्या विचारात आहेत.
प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे पुत्र असलेले जयसिंह सोळंके हे या घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे राजकीय नेतृत्व म्हणून पुढे येऊ पाहत आहेत. जयसिंह सोळंके यांनी धारूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांनी बांधकाम आणि अर्थ समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काम, सहकार क्षेत्रातील सहभाग आणि गेल्या काही वर्षांपासून माजलगाव मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क, या माध्यमातून त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.