Latur DCC Bank Election Sarakrnama
मराठवाडा

Latur Bank Election : लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय भूकंप! मतदानाआधीच घोडेबाजाराचा काँग्रेसचा आरोप; चार चेअरमन बेपत्ता?

Congress Kidnap Allegations Over Latur Bank Election : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासकरून निलंगा सोसायटी मतदारसंघात राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे.

Aslam Shanedivan

Latur Bank Election News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात काकी विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत रंगणार आहे. काँग्रेसकडून संगीता अशोक पाटील निलंगेकर, तर भाजपकडून अरविंद पाटील निलंगेकर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निलंगेकर कुटुंबातील या लढतीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निलंगा मतदारसंघाकडे लागले असतानाच काँग्रेसकडून धक्कादायक आरोप होताना दिसत आहेत. काँग्रेसने चार सोसायटी चेअरमनना पळवून नेल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकारण आता चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत अनेकदा बिनविरोध होणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेला यंदा महायुतीने पॅनल उभे करून आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून एकहाती होणाऱ्या निवडणुकीत भाजपने तगडे आव्हान उभे केल्याने मतदारांचे महत्त्व वाढले असून, प्रत्येक मतासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

निलंगा तालुक्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील निकाल जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि चिन्हवाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे.

निलंगा तालुक्यातून कोण निवडणूक लढवणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर सोसायटी मतदारसंघातून अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. तर भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिल्याच्या नियमामुळे अशोक पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

चार सोसायटी चेअरमनना पळवून नेल्याचा काँग्रेसचा आरोप

दरम्यान, या निवडणुकीत मतदारांची पळवापळवी होत असल्याचा आरोपही पुढे आला आहे. निलंगा तालुक्यातील चार सोसायटी चेअरमनना औराद पोलिसांच्या मदतीने वाहनातून कर्नाटकच्या दिशेने नेण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी केला आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना हा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विरोधी पॅनलकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात असून, काही मतदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

९९ मतदारांवर दोन्ही पॅनलचे लक्ष

निलंगा सोसायटी मतदारसंघात एकूण ९९ मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मतदारांची पळवापळवी, गुप्त रणनीती आणि राजकीय हालचालींमुळे निलंग्यातील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

देशमुख विरुद्ध निलंगेकर संघर्षाला धार

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सहकार पॅनल पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले आहे. तर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्ताबदलाचे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालकपदापुरती मर्यादित न राहता देशमुख विरुद्ध निलंगेकर अशा राजकीय संघर्षाचे स्वरूप घेत असल्याचे दिसत आहे.

या निवडणुकीदरम्यान भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत त्याची तुलना ‘दृश्यम’ चित्रपटाशी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना धीरज देशमुख यांनी बँकेचा कारभार ‘रामायणासारखा’ पारदर्शक असल्याचा दावा केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. दरम्यान, बँकेच्या एकूण १९ जागांपैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १५ जागांसाठी दोन्ही पॅनलमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. निलंग्यातील काकी-पुतण्याच्या लढतीसह जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT