Latur DCC Bank Election : संभाजी निलंगेकरांनी मला मंत्री केलेले नाही, राजीनामा मागणारे ते कोण? सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मौन सोडले!

Babasaheb Patil hits back at Sambhaji Patil Nilangekar over the Latur DCC Bank election and the demand for his resignation : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक; भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आरोपांवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा हल्लाबोल
Babasaheb Patil Sambhaji Patil Nilangekar
Babasaheb Patil Sambhaji Patil NilangekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Babasaheb Patil Resignation Controversy : 'संभाजीभैय्या मी तुमच्या वडीलांसोबत काम केलेल आहे, बोलताना जरा विचार करून बोलत जावा. अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणूकीत महायुती तोडून याची सुरूवात तुम्ही केली होती.

महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुमच्यामुळेच अपयश आले मग तुम्ही राजीनामा दिला का? मला तुम्ही मंत्री केलेले नाही, माझी लेव्हल मुख्यमंत्र्यांना माहित आहे, त्यामुळे तुम्ही माझा राजीनामा मागणारे कोण? असा हल्लाबोल राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (DCC Bank) बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत तासभर बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे नेते यांच्यावर टीका केली होती. सहकार मंत्र्यांनी या आरोपांकडे सुरूवातीपासून दुर्लक्ष केले होते. मात्र जेव्हा निलंगेकर यांनी थेट बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याची लेखी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगीतले, त्यानंतर मात्र पाटील यांचा सयंम सुटला.

एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केवळा लातूर जिल्हा बँकेतच नाही तर याआधी झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये काही ठिकाणी महायुती न होण्यास संभाजी पाटील निलंगेकर हेच जबाबदार होते, असा आरोप बाबासाहेब पाटील यांनी केला. महायुतीत पहिला मीठाचा खडा हा अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत टाकण्याचे काम निलंगेकर यांनीच केले, असा दावा करताना महापालिका, जिल्हा परिषदेत महायुतीला आलेल्या अपयशानंतर त्यांनी राजीनामा दिला का? मग लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी काँग्रेस (Congress) सोबत गेलो म्हणून राजीनाम्याची भाषा कशासाठी करतायं? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी केला.

Babasaheb Patil Sambhaji Patil Nilangekar
Latur DCC Bank : बाबासाहेब पाटलांचे जावई, निलंगेकरांचे बंधू, कराडांचे पुत्र; लातूर जिल्हा बँकेत नात्यांचे राजकारण!

मी, माझे काम, माझी लेव्हल मुख्यमंत्र्यांना माहित आहे, निलंगेकर मला बोलणारे कोण? निलंगेकरांनी मला मंत्री केलेले नाही, असे सांगतानाच बाबासाहेब पाटील यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविरोधा विधानसभा निवडणूक लढवल्याचा मुद्दा काढत मला कोणी पंतप्रधान करतो म्हंटले असते तरी मी माझ्या आजोबा विरुद्ध लढलो नसतो, अशा शब्दात टोला लगावला.

Babasaheb Patil Sambhaji Patil Nilangekar
Latur DCC Bank News : मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पलटीने संभाजी पाटील निलंगेकर भडकले, थेट राजीनाम्याची मागणी करणार

माझ्यावर आरोप करणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांच्या पोटात जिल्हा बँकेवर प्रशासक आणायचे पाप आहे. त्यांनी मला नैतिकता शिकवण्याची गरज नाही.सर्व निवडणुका निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. युती-महायुतीची बोलणी करताना त्यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या इतर नेत्यांना कधी समोर आणले नाही. आता लातूर जिल्हा बँकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढा, असे म्हणत आहेत, अशी टीकाही बाबासाहेब पाटील यांनी केली. माझा राजीनामा मागणारे संभाजीभैय्या नगरपालिका, महानगरपालिकेत गद्दारी केली म्हणून राजीनामा देणार आहेत का ? असा सवालही पाटील यांनी केला.

राज्यात जिल्हा बँकेत कुठेच युती नाही

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये राजकारण आणायचे नाही. ही पक्षाची किंवा चिन्हावरची निवडणूक नाही. चाळीस वर्षापासून बँकेचा कारभार चांगला सुरू आहे. अशावेळी जे चांगल काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळेच मी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात जिथेजिथे जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या आहेत, तिथे कुठेही महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली नाही. सगळे पक्ष एकत्र मिळून लढले, मग मी काय चुकीचे करतोय? असा सवाल बाबासाहेब पाटील यांनी केला. यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्हा बँकेत विखे - थोरात परंपरागत शत्रू एकत्र मग लातुरात एवढा तिळपापड का ? अशी विचारणा केली.

देशमुखांबरोबर प्रवासाचा आरोप खोडला

धीरज देशमुख यांच्या गाडीतून मी आलो, हा आरोप देखील खोटा असल्याचे सांगत संभाजीभैय्यांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. मी धीरज देशमुख यांच्या गाडीतून नाही, तर ते माझ्या गाडीतून अर्ज दाखल करायला आले होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेत काँग्रेस सोबत गेल्यामुळे निलंगेकर यांनी बाबासाहेब पाटील हे २०२९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील असाही आरोप केला होता. यावर काँग्रेसकडून ते उमेदवार असतील की मी? हे काळ ठरवेल असे सांगत संशयाची सुई निलंगेकर यांच्याकडे वळवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com