Latur News : अशिक्षित, आदिवासी भागात काही भोंदू भानामती, चेटूक, बाधा झाल्याचे सांगून गोरगरिबांना फसवतात, अघोरी उपाय, नरबळी, पशुबळीसारखे उपाय सुचवून आपले पोट भरतात. मात्र, ज्यांच्यावर हे सगळं रोखण्याची कायद्याने जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे कायद्याचे रक्षक म्हणून बघितले जाते, ते पोलिसच जेव्हा अशा प्रकारांच्या नादी लागतात तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले म्हणून चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच बोकडाचा बळी देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ज्या पोलिसांवर अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर लगाम घालण्याची जबाबदारी आहे, तेच जेव्हा असे वागू लागतात तर दाद तरी कोणाकडे मागावी, असा प्रश्न या प्रकारानंतर निश्चितच पडतो.
लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराला जबादार अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाईची मागणी केली आहे, तर पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी हा प्रकार ठाण्यातील जातीयवादी कर्मचारी आणि गटबाजीतून मुद्दाम घडवून आणल्याचा आरोप करत हात झटकले आहेत.
वर्षभरापूर्वी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हे आणि अपघाताच्या घटनामध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पण यामागची कारणे शोधण्याऐवजी त्यावर उपाय म्हणून चक्क बोकड कापण्याची शक्कल एका अधिकाऱ्याने सुचवली. इतर सहकाऱ्यांनाही ती इतकी भावली, की त्याची तत्काळ अंमलबजावणी झाली. काळ्या रंगाचा बोकड आणि तो कापण्यासाठी कसायाला पोलिस ठाण्यात पाचारण करण्यात आले.
अगदी सकाळीच या बोकडाचा पोलिस ठाण्याच्या गेटवरच बळी देण्यात आला. मग हे गतप्राण झालेले बोकड एका फार्महाऊसवर नेऊन त्याची बिर्याणी करून सगळ्यांनी प्रसाद म्हणून ती खाल्ली. बर या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ आणि फोटोही लगोलग सोशल मिडियावर व्हायरल झाले. आता हे कोणी मुद्दाम केली, की मग आपण काहीतरी वेगळी कामगिरी केली या भावनेतून ते ज्यांनी बोकड कापायला सांगितला त्यांनीच सार्वजनिक केले हे समोर यायचे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघात आणि गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बोकडाचा बळी देण्यात आल्याची भनक लागताच एकच खळबळ उडाली. आता हे प्रकरण मिटवामिटवीचे आणि टोलवाटोलवीचे प्रकार सुरू झाले आहेत. ज्यांनी बोकड कापण्याची आयडिया दिली, ते आणि ज्यांनी बिर्याणीचा प्रसाद खाल्ला ते सगळेच एकमेकांकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे राज्यात जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला, तेव्हा तो याच पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्याच पोलिस ठाण्यात या कायद्याला हरताळ फासण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(Edited by Sachin waghmare)