Assembly Session News : लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन अडीच वर्षापासून बंद आहे. याचा फटका गोरगरिब रुग्णांना बसतो आहे. वारंवार पाठपुरावा, मागणी करूनही ही उपकरणे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. गोरगरिब रुग्णांसाठी सरकारकडे पैसा नाही का? असा संतप्त सवाल आमदार अमित देशमुख यांनी सभागृहात उपस्थित केला. रुग्णांचे होणारे प्रचंड हाल रोखण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून सिटी स्कॅन, एमआरआय दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठवाड्यातील शेती, आरोग्य, शिक्षणासंदर्भात अनेक विषय त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींकडून मांडले जात आहेत. लातूर शहरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी अडीच वर्षापासून बंद पडलेल्या लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीनचा मुद्दा उपस्थित केला. ही दोन्ही उपकरणं मागच्या अडीच वर्षापासून बंद आहेत. यामुळे सामान्य परिस्थितीतील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
आता खासगी भागीदारीतून या मशीन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, याचे कारण काय? या अत्यंत महत्त्वाच्या सुविधेसाठी शासनाकडे पैसा नाही का ? असा प्रश्न उपस्थित करून या मशीन खरेदीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अमित देशमुख यांनी केली. (Latur) या प्रश्नाला उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी भागीदारीची बाब मान्य केली.
परंतु लातूर येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत हस्तक्षेप करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना केली. त्यानीही ती सूचना मान्य करत याकामी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी बांधील..
दरम्यान, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही लोकशाही व्यवस्थेची दोन प्रमुख चाके आहेत, यातील कोणतेही एक चाक कमकुवत होऊन चालत नाही, मात्र सध्या सत्ताधारी मंडळीकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे, असा आरोप अमित देशमुख यांनी केला. काल महाराष्ट्र विधानसभेत याचा प्रत्यय आला, काँग्रेस पक्षाचे नेते नानाभाऊ पटोले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकिने बोलत असताना, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना एक दिवसासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले.
एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेची गळचेपी करण्याचीच ही कार्यवाही आहे. लोकशाही व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष जनतेची बाजू आजवर मजबुतीने मांडत राहिला आहे आणि यापुढेही तो मांडत राहील, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसजण बांधील आहोत, असेही देशमुख म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.