Congress-BJP News : लातूर महापालिका निवडणुकीचा प्रचार यावेळी चांगलाच गाजला. नेहमीच्या आरोप-प्रत्यारोप, राजकीय कुरघोडीमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जुंपल्याचे दिसून आले. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील याची शंभर टक्के खात्री व्यक्त केली. आणि काँग्रेसच्या हाती आयते कोलीत आले.
काँग्रेस आणि आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवत रान पेटवले. भाजपसाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे हे विधान सेल्फ गोल ठरतो की काय? अशी चिंता पक्षाच्या स्थानिक नेते आणि समर्थकांना सतावत होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून पक्षाची अगदी चलाखीने सुटका केली. विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतानाच लातूरसाठी गोपीनाथ मुंडे यांचेही योगदान विसरता येणार नाही, असे सांगत फडणवीसांनी बॅलेन्स साधला.
भाजप या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे, तर महायुतीतील त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही स्वतंत्र चूल मांडली आहे. परंतु भाजप आणि घड्याळाची छुपी युती असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजपला लातूरमध्ये झिरो टू हिरो करण्याचे श्रेय घेणारे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा गेल्यावेळचा करिष्मा करता येतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. यापैकी अठरा जणांची भाजपमधून हाकालपट्टी करत पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका घेतल्याचा संदेश यातून दिला गेला. दुसरीकडे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी जुळवून घेत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेली वोट बँक आपल्याकडे खेचण्याची खेळी केली आहे. काँग्रेसचा हा डाव कितपत यशस्वी होतो? हे 16 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही लातूरमध्ये जोर लावला आहे. अजित पवारांनी इथे बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवडमधील विकासाचे माॅडेल राबवण्याचा वादा लातूरकरांना केला आहे. एकूणच लातूर महापालिकेची सत्ता राखण्याचे आणि भाजपकडून ती पुन्हा खेचून आणण्याचे आव्हान काँग्रेस समोर असणार आहे.
2012 मध्ये झालोल्या लातूर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवले होते. स्मिता खानापुरे या महिलेला पहिल्या महापौर होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यानंतर 2017 मध्ये लातूर महापालिकेची निवडणूक झाली. भाजपने 36 नगरसेवक निवडून आणत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता काबीज केली होती. आता तिसऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पंजा पकड मिळवणार, की मग भाजपचे कमळ दुसऱ्यांदा फुलणार? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकी काँग्रेसने एकहाती महापालिकेची सत्ता मिळवली होती. 70 पैकी 49 नगरसेवक निवडून आणत काँग्रेसने बहुमतासह लातूर महापालिकेत पाच वर्ष सत्ता गाजवली. या निवडणुकीत भाजपला (BJP) भोपळाही फोडता आला नव्हता. शिवसेनेचे या महापालिकेत 6 नगरसेवक निवडून आले होते. 2017 मध्ये मात्र हे चित्र बदलले आणि काँग्रेस-भाजपमध्ये काटे की टक्कर झाली.
2017 मध्ये लातूर महापालिकेचा निकाल लागला तेव्हा भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. 2012 मध्ये झिरो असलेल्या भाजपने 36 नगरसेवक निवडून आणत हिरोची भूमिका निभावली होती. काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. मतदारांनी काँग्रेसला पुर्णपणे नाकारले नसले तरी त्यांना सत्तेपासून रोखले होते. काँग्रेस (Congress) पक्षाला 33 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एक जागा जिंकत खाते उघडले. तर शिवसेनेला आपल्या जागा राखता आल्या नाही. लातूर महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलले होते. पण अडीच वर्षानंतर काँग्रेसने भाजपचे दोन नगरसेवक फोडले आणि पुन्हा सत्ता मिळवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.