Marathwada Drought News : लातूर जिल्ह्यातील दीडशे जलप्रकल्प सध्या कोरडे पडले आहेत. पावणे तीन महिन्यापासून पावसाचा थेंब जिल्ह्यात पडलेला नाही. अशावेळी भविष्यात जिल्ह्यावर येणारे मोठे जलसंकट पाहता उजणीचे पाणी लातूरला आणण्यासाठी आताच प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी लातूरवर घोंगावणाऱ्या प्रचंड पाणी टंचाई पाहता प्रशासनाने वेगाने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली.
पावसाचे दुर्भिक्ष, घटती भूजल पातळी आणि कोरडे पडलेले जलप्रकल्प यामुळे लातूर जिल्हा आगामी काळात २०१५-१६ पेक्षाही गंभीर जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या संकटावर फेब्रुवारी-मार्चमध्ये टँकरची व्यवस्था करण्यापेक्षा उजनी धरणातून जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आणण्यासाठी आतापासूनच ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. १५ जानेवारीपूर्वी हे पाणी आणण्याच्या दृष्टीने नियोजन आणि पाठपुरावा केल्यास भविष्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यास मोठी मदत होईल, असेही निलंगेकर यांनी बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक पार पडली. निलंगा तहसील कार्यालयातून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील यांच्यासह अधिकारी यात ऑनलाईन सहभागी झाले होते.उष्णता आणि पावसाच्या कमतरतेमुळे निलंगा मतदारसंघासह जिल्ह्यातील शेकडो बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे. नोव्हेंबर महिन्यातच अनेक गावांतून टँकरची मागणी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील उपाययोजना आताच कराव्यात.
उजनी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेसाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. मात्र, आता खर्च वाढून सुमारे दीड हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे आग्रह धरल्यास ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले. पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी सुदान ग्रासचे बियाणे उपलब्ध झाले आहे.
चारा लागवडीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मजुरी, वीज, पाणी व जमीन यांसह एकरी एक लाख २१ हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकरी ३५ मेट्रिक टन चारा मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरसाठी अर्ज प्राप्त झाले असून, पाच हजार अर्जांची पडताळणी झाली आहे. लागवड पूर्ण झाल्यानंतर सुमारे दोन लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल. लहान उसापासून चारा तयार करणे तसेच साखर कारखान्यांच्या बगॅसपासून पोषक चारा उपलब्ध करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.