Mahayuti Latur News : लातूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सुमार कामगिरीमुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचे आमदार अमित देशमुख यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. महायुतीकडे बहुमत असले तरी स्थानिक नेते कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असले? याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
तर दुसरीकडे राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेत जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी काल (ता.13) मुंबईत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुंबईतील 'पन्हाळगड' या शासकीय निवासस्थानी खलबते झाली. महायुतीचे निवडून आलेले सर्व सदस्य व जिल्ह्यातील भाजप नेत्यांची एक बैठक पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर झाली. त्यात लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा म्हणजे भाजपाचा अध्यक्ष करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार संभाजी पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, अरविंद पाटील निलंगेकर या लातूरच्या स्थानिक नेत्यांनी जनतेने ज्या विश्वासाने महायुतीला विजयाचा कौल दिला त्याच विश्वासाने जिल्हा परिषदेचा कारभार करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांना दिली.
आगामी काळात लातूर जिल्हा परिषद नव्या विकासाच्या शिखरावर असेल आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून भक्कमपणे केले जाईल, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील मायबाप जनतेने महायुतीवर जो अढळ विश्वास दाखवून भरघोस यश मिळवून दिले आहे, त्याबद्दल बैठकीत सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
येणाऱ्या काळात लातूर जिल्हा परिषद विकासाचे नव नवीन टप्पे निश्चितपणे गाठेल आणि ग्रामीण भागातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या प्रश्नाला भक्कमपणे न्याय दिला जाईल, याबद्दल खात्री देत भाजपाच्या नेत्यांनी लातूर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले.
लातूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य हे काँग्रसेचे आहेत, तर भाजपा-18, राष्ट्रवादी काँग्रेस-12, शिवसेना-01, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष-01, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-01, मनसे-01, अपक्ष-02 असे संख्याबळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.