NCP - Ajit Pawar Group  Sarkarnama
मराठवाडा

NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या 'या' नेत्याने घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची दिल्लीत भेट; नेमकं काय घडलं ?

Deepak Kulkarni

Parbhani News : गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांच्यात अनेक दिवसांपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत होते. मात्र, राजेश विटेकर समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभापती निवडीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांना साथ दिल्याने बाजार समिती निवडणुकीत बहुमत असूनही महाविकास आघाडीला सत्ता राखता आली नाही.

पण आता याच आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राजेश विटेकरांसह दिल्ली गाठत थेट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली आहे. यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते राजेश विटेकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मध्यस्थीने झालेली ही भेट जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी असल्याचे राजेश विटेकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने परभणीच्या जागेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री संजय बनसोडे यांची नियुक्ती हा या प्रयत्नाचाच भाग असल्याचे मानले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजेश विटेकर हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाला, तर राजेश विटेकर हे प्रथम क्रमाकांचे दावेदार आहेत. या पार्श्वभूमीवर राजेश विटेकर यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली महत्त्वाची मानली जाते.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेतील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील काही प्रकल्पांच्या संदर्भात तसेच गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपूलसह भुयारी मार्ग, शहर बाह्यवळण रस्ता, गंगाखेड-पालम ते लोहा, इसाद- पिंपळदरी फाटा- सुप्पा-पिंपळदरी ते किनगाव राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ७५२ गोदावरी नदीवरील पूल व इतर काही रस्त्यांचे डांबरीकरण तसेच पूल मोऱ्यासह सुधारणा या मागण्यांसंदर्भात ही भेट असल्याचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत होते. मात्र, राजेश विटेकर समर्थक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभापती निवडीमध्ये आमदार गुट्टे यांना साथ दिल्याने बाजार समिती निवडणुकीत बहुमत असूनही महाविकास आघाडीला सत्ता राखता आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या प्रकारास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत राजेश विटेकर समर्थक असलेल्या शहराध्यक्षाची हकालपट्टी करत नूतन शहराध्यक्ष नेमले. (NCP Ajit Pawar Group News)

भारतीय जनता पक्षाचे नेते परभणी लोकसभा मतदारसंघावर वारंवार दावा करत असून, त्या दृष्टीने तयारीसुद्धा सुरू झाली आहे. विधानसभानिहाय लोकसभा आढावा बैठका घेण्यात येत आहेत. बूथस्तर व शक्ती केंद्र स्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे.

माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन लोणीकर यांनी मी मंत्री झालो, तर परभणीचा खासदार व चारही आमदार भाजपचे असतील, असे विधान केले होते. तसेच जिंतूर येथील लोकसभा आढावा बैठकीत लोकसभा समन्वयक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरही परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल, असे म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT