Ashok Chavan-Pratap Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar: अशोक चव्हाणांची पक्षात एन्ट्री माजी खासदार चिखलीकरांच्या एक्झिटला ठरली कारणीभूत!

Ashok Chavan's Entry Causes Former MP Chikhalikar's Exit from the Party :अनेक पक्ष बदलल्यानंतर भाजपमध्ये चिखलीकरांचे बसस्तान बसले होते मात्र सात महिन्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच चिखलीकर यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

Jagdish Pansare

Loha Vidhan Sabha Election 2024: नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी गेली अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेल्या दोन मोठ्या नेत्यांना एकाच पक्षात काम करणे कठीण जाते एका म्यानात जशा दोन तलवारी राहू शकत नाहीत, तसेच दोन महत्त्वाकांक्षी नेते एकाच पक्षात फार काळ टिकत नाहीत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात असाच अनुभव सध्या येताना दिसतो.

भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपला रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला प्रवेश करतात त्यांना पक्षाने लोहार कंधारची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांचे हे सहावे पक्षांतर आहे.

काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिखलीकर दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तेव्हापासूनच प्रताप पाटील चिखलीकर यांची पक्षात घालमेल सुरू झाली होती तसे पाहायला गेले तर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये एकत्र होते परंतु सातत्याने आपल्याला डावलण्याचा आणि आपल्यावर अन्याय करण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न राहिला म्हणून आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडलो होतो असे चिखलीकर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते.

अनेक पक्ष बदलल्यानंतर भाजपमध्ये चिखलीकरांचे बसस्तान बसले होते मात्र सात महिन्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच चिखलीकर यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र भाजपने लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यांना निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवली.

अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमांमधून प्रताप पाटील चिखलीकर आणि आमच्यात आता पहिल्यासारखे काही वाद राहिलेले नाहीत, कार्यकर्त्यांनी मनात कुठलीही शंका बाळगू नका. नांदेड लोकसभेची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

अशोक चव्हाण यांनी लोकसभेला निवडून आणण्याची गॅरेंटी दिल्यामुळे मध्यंतरीच्या काळात चिखलीकर यांनीही त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रताप पाटील चिखलीकर यांची वैयक्तिकशक्ती अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर दुपटीने वाढली, असा समज झाला.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष सोबतीला असूनही लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी दारुण पराभव केला हा पराभव चिखलीकर यांच्या जिव्हारी लागला अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचे कार्यकर्ते गाफिल राहिले, असा नाराजीचा सूर चिखलीकरांनी तेव्हा काढला होता.

लोकसभेच्या प्रचारादरम्यानही दोघांमध्ये फारसे सख्खे दिसून आले नव्हते. काही कार्यक्रमांमध्ये चव्हाण चिखलीकर एका व्यासपीठावर दिसले मात्र, निवडणुकीच्या मैदानात दोघांच्याही भूमिका स्वतंत्र होत्या याचा फटका लोकसभेला चिखलीकर यांच्या पराभवात झाला. तेव्हापासून प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मनात पक्षांतराचे विचार घोळू लागले होते.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळते का याची वाट चिखलीकर पाहत होते याशिवाय लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा लोहा कंधार मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार, असे चिखलीकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले.

मात्र भाजपच्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीत लोहा कंधारच्या उमेदवारीवर निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांची घालमेल अधिकच वाढली. दुसरीकडे भोकरमध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना पहिल्या यादीमध्येच उमेदवारी जाहीर झाली होती.

पक्षामध्ये आपल्यापेक्षा अशोक चव्हाण यांचे महत्त्व वाढत असल्याचे चिखलीकर यांच्या लक्षात येत होते. लोकसभेचा उमेदवार ठरला नाही दुसरीकडे विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून मिळण्याची शक्यता मावळत असल्याने अत्यंत कमी वेळ पाहता चिखलीकर यांनी महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत थेट लोहा कंधार मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. आता चिखलीकरांच्या या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महायुतीत काही तानातानी होते का की हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता यांच्या नावाची चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चार दिवसांवर आलेली असतानाही भाजपकडून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने अखेर चिखलीकरांनी लोहा कंधार विधानसभेसाठी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.

चिखलीकरांसाठी लोहा कंधारची निवडणूक मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांच्यामुळे सोपी नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शंकर अण्णा धोंडगे यांच्या रूपाने या मतदारसंघात एकदा विजय मिळवला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी आणि वैयक्तिक ताकद या जोरावर चिखलीकर विधानसभेचे मैदान मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेले हे पक्षांतर त्यांना विधानसभेत यश मिळवून देते का हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल मात्र चिखलीकर यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेण्यामागे अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आणि भाजपमध्ये वाढत असलेले वजन हे एक कारण असल्याचे देखील बोलले जाते.

चिखलीकर यांनी पक्ष सोडण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते, माध्यमांशी बोलताना मला पर्याय राहणार नाही मी भाजप सोडली तर पक्षात काय राहील, अशी चिखलीकरांची भाषा त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे संकेत देणारी होती.

अखेर विधानसभेच्या उमेदवारीसाठी चिखलीकरांनी पुन्हा एकदा पक्षांतर केले आहे दुसरीकडे चिखलीकर भाजपमधून गेल्यामुळे नांदेड जिल्ह्यात आता अशोक चव्हाण अधिक मुक्तपणे काम करू शकतील असे बोलले जाते.

जिल्ह्याच्या राजकारणात चव्हाण चिखलीकर यांच्यातील वैर सर्वश्रुत होते, परंतु लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने अशोक चव्हाण यांना पक्षात घेत मोठी खेळी केली. परंतु राज्यात आणि विशेषता मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या विषयाने ही खेळी फसली मात्र विधानसभा निवडणुकीत नांदेड सह मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा भाजपच्या वरिष्ठांना अजूनही आहे.

त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर भाजपने अशोक चव्हाण यांना झुकते माप दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे नाराज असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिवाय चिखलीकर हे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षात गेल्यामुळे तसा भाजपला फारसा धोका निर्माण होणार नाही असे दिसते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT