केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा याआधी दोन वेळा रद्द झालेला दौरा अखेर आज पूर्ण होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर लोकसभा क्लस्टरसाठी अमित शाह यांची एकत्रित जाहीर सभा आज सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच आज संभाजीनगरातून फुटणार आहे. त्यामुळे या सभेतच शाह संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार जाहीर करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Marathi News)
शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युतीमुळे गेल्या 35-40 वर्षांपासून भाजपला संभाजीनगरमधून लोकसभा लढवता आलेली नाही. त्यामुळे पहिल्यांदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या तयारीला भाजप लागली आहे. अमित शाह यांचा दौरा आणि आजची सभा निर्णयक ठरणार असून, उमेदवारीबाबतीत धक्कातंत्रासाठी ओळखले जाणारे शाह नेमका कोणाला धक्का देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad), राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विजया रहाटकर यांची प्रामुख्याने नावे चर्चेत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय जीवन राजपूत हे नवे नाव अनपेक्षितपणे गेल्या काही दिवसांपासून शहरात व जिल्ह्यात पुढे आले आहे. राजपूत यांच्या दाव्यानुसार म्हणे त्यांचे नाव संघ परिवार व विश्व हिंदू परिषदेने सुचवले आहे, पण स्थानिक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी मात्र त्यांचा हा दावा फेटाळला आहे. परंतु जेआर नावाने शहरात केलेली पोस्टरबाजी आणि शक्तिप्रदर्शनामुळे ते चर्चेत आले आहेत.
अतुल सावे (Atul Save) यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामार्फत कळवले आहे, तर कराड यांच्या विजयाबद्दल भाजप स्वतःच साशंक असल्याची चर्चा आहे. अशावेळी भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह नेमका काय निर्णय घेतात, धक्कातंत्राचा वापर करतात? की मग चर्चेतल्या नावातील एकावर शिक्कामोर्तब करतात हे आजच्या सभेनंतर स्पष्ट होईल.
दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी मात्र या सभेपासून अद्यापपर्यंत तरी दूर आहेत. या सभेची संपूर्ण तयारी आणि नियोजन भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच केले. यात कुठेही घटक पक्षाचे आमदार, मंत्री किंवा पदाधिकारी दिसले नाहीत. आता अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर ते आज दिसण्याची शक्यता आहे. घटक पक्षांमधील हा निरुत्साह संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार म्हणून असल्याचीही चर्चा आहे.
शिवसेनेने संभाजीनगर लोकसभेवरचा दावा सोडल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी स्पर्धेतही नव्हती. शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा आणि राज्यातील भाजपचे सगळे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी मात्र झाडून हजेरी लावणार आहेत. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल रात्रीच शाह यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत केले. शहरात मुक्कामी असलेले अमित शाह सकाळीच हेलिकाॅप्टरने अकोला आणि जळगाव दौऱ्यावर निघून गेले. आता ते थेट सायंकाळी साडेसहाच्या सभेसाठीच शहरात दाखल होणार आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.