Chhatrapati Sanbhajinagar News : संभाजीनगर लोकसभेवरचा भगवा 2019 च्या निवडणुकीत मतांच्या फाटाफूटीमुळे उतरला होता. तो पुन्हा फडकावा यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुलताबाद येथील भद्रा मारोतीला साकडे घातले. संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सोबत घेत ठाकरे यांनी आज वेरुळच्या घृष्णेश्वरासह भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. हिंगोली, नांदेड जिल्ह्याचा दौरा पुर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरे आज मुक्कामासाठी संभाजीगरात आले होते. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रातील 48 पैकी 20 ते 22 जागा ठाकरे गट लढवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले असून येत्या दोन दिवसात एकत्रिपणे ते जाहीर केले जाणार आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या हिंगोली, नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्या जनसंवाद, कुटुंब संवाद सभा, मेळावे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.
हा दौरा आटोपून उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आदी नेते संभाजीनगरात दाखल झाले. सायंकाळी हे सगळे नेते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी दर्शन घेत संभाजीनगरसह राज्यातील जिथे जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार लढतील त्यांना यश मिळावे यासाठी साकडे घातले.
छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे आवडते शहर होते. शिवसेनेला पहिल्याच महापालिका निवडणुकीत 27 नगरेवक निवडून देत येथील जनतेने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना भरभरून साथ दिली होती. त्यानंतर विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद अशा सगळ्याच निवडणुकीत शिवसेनेला सातत्याने यश मिळत गेले. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व होते.
गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे (Chandrant Khaire) यांचा पराभव झाला आणि तो उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. संभाजीनगरमध्ये खैरे नाही, तर मी हरलो, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी जालन्यात बोलतांना दिली होती. 2024 मध्ये शिवसेनेचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा आणि भगवा फडकवायचा, असा निर्धार ठाकरे यांनी केला आहे. हाच निर्धार घेऊन त्यांनी संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सोबत घेत देवदर्शन घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत हेही यावेळी उपस्थितीत होते.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.