Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Election: वंचितच्या उमेदवारीने लातुरात आघाडीचं टेन्शन वाढलं

VBA Vs MVA: लातूर मतदारसंघातून वंचितने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीच्या डॉ. विजय काळगे यांचे टेन्शन वाढवले आहे. लातूरमध्ये सर्वप्रथम भाजपने विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Jagdish Pansare

Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडी (VBA) राज्यातील महाविकास आघाडीचा घटक होईल, असे वाटत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. विदर्भातील आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर वंचितने काल दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव, जालना, हिंगोली आणि लातूर (Latur) या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

लातूर (Latur) मतदारसंघातून वंचितने नरसिंग उदगीरकर (Narsingh Udgirkar) यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीच्या डॉ. विजय काळगे यांचे टेन्शन वाढवले आहे. लातूरमध्ये सर्वप्रथम भाजपने विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shringare) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने (Congress) डॉ. शिवाजी काळगे (Shivaji Kalge) यांच्या रूपाने उच्चशिक्षित आणि नवा चेहरा दिला. त्यामुळे लातूरात थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, असे वाटत होते. मात्र, आता वंचितच्या एन्ट्रीने इथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजय काळगे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांच्या विजयासाठी आमदार अमित देशमुख, (Amit Deshmukh) धीरज देशमुख जोमाने कामाला लागले आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून देशमुख बंधू धुरा सांभाळत आहेत, तर त्यांचे काका दिलीपराव देशमुखांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. दुसरीकडे भाजपचे (BJP) सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचाराला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही.

भाजपने लातूर लोकसभेसाठी संयोजकाची समिती गठीत केली असून, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता भाजपच्या प्रचाराला वेग येईल, असे दिसत आहे. अशातच वंचितने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी जाहीर करून लातूर लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. वंचितचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे मूळचे उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी आहेत.

लातूर हा राखीव मतदारसंघ असून, तिरंगी लढतीमुळे इथले चित्र बदलणार आहे. उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. या वेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. 2019 मध्ये वंचित आघाडीने इथून निवडणूक लढवली होती. राम गारकर यांनी तेव्हा 1 लाख 12 हजार मते मिळवली होती, पण तेव्हा वंचितची एमआयएमशी (MIM) युती होती.

आता वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला अशी ओळख असलेला लातूरचा हा गड भाजपने आपल्या ताब्यात घेतला आहे. यंदा भाजप सलग तिसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. लातूरमध्ये महाविकास आघाडी असली तरी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात फारशी नाही. त्यामुळे काँग्रेसला एकट्याच्या खांद्यावरच ही निवडणूक लढावी लागणार आहे.

आघाडीला फटका तर युतीला फायदा

वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, तर मत विभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो. सुधाकर श्रृंगारे यांच्याविरोधात वातावरण असले तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. येणाऱ्या काही दिवसांत भाजपची प्रचार यंत्रणा पूर्णपणे सक्रिय होईल, त्यानंतरच मतदारंघातील खरे चित्र स्पष्ट होईल. तूर्तास वंचितच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीला फायदा होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT