Shivaji Kalge, Archana Patil, Sudhakar Shringare, Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Lok Sabha News : लातूर, धाराशिवमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला... कोण गाठणार दिल्ली?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील लोकसभेच्या (Marathwada Lok Sabha News) धाराशिव आणि लातूर मतदारसंघातील प्रचार आज संपला. या दोन्ही मतदारसंघात आता 7 मे रोजी मतदारराजा कोणाला दिल्लीत पाठवायचं अन् कोणाला घरी बसवायचं?, हे ठरवणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.

पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विद्यमान खासदार ओमराजे यांच्यासाठी दोन सभा घेतल्या. विकासकामे, निधी यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले. याशिवाय ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), अर्चना पाटील यांनी ऐकमेकांवर वैयक्तिक टीका केल्याचे दिसून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ओमराजे यांना लक्ष्य करण्यात आले होते. (Lok Sabha Election 2024)

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ओमराजे यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचे दिसून आले होते. अर्चना पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर या दोन घराण्यामधील संघर्ष धाराशिवकरांना नवा नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये राणा पाटील विरुद्ध ओमराजे असा सामना झाला होता. यात ओमराजेंची सरशी होऊन त्यांनी राणा पाटलांना धोबीपछाड दिला होता. यावेळी राणा पाटील भाजपमध्ये आहेत, अजित पवार गटाला महायुतीत जागा सुटल्याने अर्चना पाटील यांना ओमराजे यांच्याविरोधात मैदानात उतरवत अजित पवारांनी पुन्हा जुन्या संघर्षाला हवा दिली.

लातूरात देशमुख, निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला..

लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुती हॅटट्रिकसाठी झटत आहे, तर महाविकास आघाडीच्या देशमुखांना लातूरवर पुन्हा वर्चस्व मिळवायचे आहे. शिवाजी काळगे यांच्यासारखा नवा चेहरा देत काँग्रेसने महायुतीच्या सुधाकर श्रृंगारे यांना आव्हान दिले आहे. काळगे यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ही देशमुख कुटुंबाने स्वीकारली होती.

आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख या सगळ्यांनी काळगेंचा प्रचार जोमात केला. महायुतीचे सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरात सभा घेत भाजपला बुस्टर डोस दिला. श्रृंगारे यांच्या प्रचाराची धुरा पुर्णपणे आमदार संभाजी पाटील निंलगेकर यांच्या खांद्यावर होती. सुरवातीला काहीसे मागे पडलेले खासदार श्रृंगारे शेवटच्या टप्प्यात मात्र बरेच पुढे आले.

भाजपने लातूर शहराच्या पाण्याचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा करत त्यासाठी देशमुख कुटुंबाला जबाबदार ठरवले. तर लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी अजून का सुरू झाली नाही? हा मुद्दा पुढे करत देशमुखांनी निलंगेकरांना लक्ष्य केले. एकूणच मराठवाड्यातील या दोन्ही महत्वाच्या मतदारसंघात मतदार राजा कोणाला संधी देतो हे 7 मे रोजीचे मतदान आणि 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

मराठवाड्यातील आठ पैकी परभणी, हिंगोली, नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. मराठवाड्यातील शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या 13 मे रोजी बीड, जालना, संभाजीनगर या मतदारसंघात पार पडणार आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT