Imtiyaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiyaz Jaleel News : इम्तियाज जलील यांची खेळी, पाठिंब्याच्या बदल्यात मतांची हमी

Lok Sabha Election 2024 : वंचितमुळे गेल्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा लाखोंची मते कशी मिळवणार? हा मोठा प्रश्न 'एमआयएम'समोर आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : 'एमआयएम'चे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) सध्या बरीच लवचिक भूमिका घेताना दिसत आहेत. विशेषतः मराठा समाजातील चांगल्या उमेदवारांना त्यांनी मागितला नाही, तरी पाठिंबा देण्याची तयारी इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. एवढेच नाही तर आघाडीसाठी भटकणाऱ्या आपल्या जुन्या मित्र पक्षाला म्हणजेच वंचित आघाडीला ( Vanchit Aghadi ) युतीसाठी पुन्हा साद घातली आहे.

गेल्या वर्षभरात इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ), काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीकडे आम्हाला सोबत घ्या, म्हणत फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. यातून 'एमआयएम' आणि इम्तियाज यांची राज्यभरात चर्चा झाली. मात्र, त्यातून साध्य काहीच झाले नाही. परंतु, आता फिरकी घेण्याची वेळ निघून गेली असून, ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे याची जाणीव 'एमआयएम'ला झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा उमेदवारांना पाठिंबा, वंचितला साद घालण्याची लवचिक भूमिका घेत इम्तियाज यांनी सहानुभूती आणि त्याआधारे गैरमुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या काळात हे दिसून येईल. तूर्तास इम्तियाज जलील यांच्या भूमिकेने विरोधकांना चिंतेत टाकले आहे. 2019 च्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मिळालेला विजय हा हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात झालेले विभाजन आणि वंचितसोबत असलेल्या युतीमुळे दलितांच्या एकगठ्ठा मतांमुळे झाला हे स्पष्ट आहे.

राज्यात या वेळीही इम्तियाज जलील यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. मराठा आरक्षणावरून दोन गट, ओबीसी-मराठा संघर्ष, शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये पडलेली फूट, महाविकास आघाडी-महायुती-'एमआयएम' या तिरंगी लढतीत मराठा समाजाचा स्वतंत्र उमेदवार लढण्याची शक्यता असल्यामुळे गेल्यावेळीसारखीच परिस्थिती निर्माण होणार आहे. या चौरंगी लढतीत इम्तियाज यांना दुसऱ्या विजयाची गॅरंटी वाटू लागली आहे.

परंतु, वंचितमुळे गेल्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा लाखोंची मते कशी मिळवणार? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भाजपची 'बी' टीम असा शिक्का बसल्यामुळे 'एमआयएम'ला युतीसाठी कोणीही जवळ करायला तयार नाही. प्रकाश आंबेडकर यांना साद घालणाऱ्या इम्तियाज जलील यांच्याच हेकेखोरपणामुळे गेल्यावेळी आंबेडकरांनी 'एमआयएम'शी काडीमोड घेतला, असेही बोलले जाते.

आंबेडकरांचा स्वभाव पाहता ते पुन्हा 'एमआयएम'च्या वाटेला जातील, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी मराठा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून जिथे 'एमआयएम'चे उमेदवार लढतील तिथे या समाजाचा काही फायदा मतांच्या रूपात आपल्याला होतो का? विशेषतः संभाजीनगरात असा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) यांच्या उपोषणाला भेट देत इम्तियाज यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता.

एवढेच नाही, तर मोठ्या भावाला आरक्षण मिळत असेल तर लहान भाऊ थांबायला तयार आहे, अशी भूमिका घेत सहानुभूती मिळवली होती. गेल्या पाच वर्षांत खासदार म्हणून संसदेत आपण आवाज उठवलेल्या विषयांची उजळणी आणि मतदारांना आठवण करून देण्याचा प्रयत्न हादेखील मतांच्या अतिरिक्त जुळवाजुळवीसाठीच असल्याचे स्पष्ट आहे. आता त्यांच्या लवचिक भूमिकेला आणि प्रयत्नांना मतदार किती आणि कसा प्रतिसाद देतात हे प्रत्यक्ष मतदान आणि त्यानंतरच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

( Edited by : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT