Lok Sabha Election 2024 : खैरेंना निष्ठेचे फळ, उमेदवारी मिळाली; आता करावी लागणार तारेवरची करसत

Chandrakant Khaire News : शिवसेनच्या शाखा स्थापनेपासून म्हणजेच संघर्षाच्या काळापासून ते सत्तेच्या सोपानापर्यंतचा अनुभव आणि उपभोग खैरे यांना मिळाला.
uddhav thackeray chandrakant khaire
uddhav thackeray chandrakant khairesarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajianagr News : शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची राज्यातील यादी आज बुधवारी ( 27 मार्च ) जाहीर झाली. मराठवाड्याचा विचार केला तर यात पक्षनिष्ठेला महत्व दिले गेल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ), परभणी संजय जाधव ( Sanjay Jadhav ), हिंगोली नागेश पाटील-आष्टीकर ( Nagesh Patil Ashtikar ) आणि धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांना पक्षाने संधी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जेव्हा शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाऊन सरकार कोसळले, तेव्हा हे शिलेदार शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

अनेक अमिष दाखवली गेली, ईडीच्या धमक्या, पन्नास खोक्यांची ऑफर अशा सगळ्या प्रलोभनाला बळी न पडता ही मंडळी पडत्या काळात उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) पाठीशी ठामपणे उभी राहिली. अशावेळी निष्ठेची किंमत केली नसती तर पुन्हा कुणी अशी हिमंत दाखवली नसती. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मुंबई, ठाणे, पुण्यानंतर शिवसेनेला बालेकिल्ला ठरावा इतके घवघवीत यश संभाजीनगरनेच दिले.

शाखेपासून ते सत्तेपर्यंतचा उपभोग खैरेंना मिळाला

अगदी पहिल्याच महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून येण्याचा चमत्कार याच संभाजीनगरात घडला. तेव्हापासून लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थामधील शिवसेनेची सत्ता आणि भगवा कायम राहिला. यात कट्टर शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाचा वाटा होता हे कोणीही नाकारणार नाही. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक शिलेदार होते. शिवसेनच्या शाखा स्थापनेपासून म्हणजेच संघर्षाच्या काळापासून ते सत्तेच्या सोपानापर्यंतचा अनुभव आणि उपभोग खैरे यांना मिळाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...म्हणून जिल्ह्यात खैरेंची ओळख

शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, विरोधी पक्षनेता, आमदार, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकसभेवर सलग चारवेळा विजय हे खैरेंचं प्रगती पुस्तक. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आणि ते सांगतील ती कामगिरी फत्ते करण्याच्या जबाबदारीतील मोठा वाटा कायम खैरे यांनी उचलला. सर्वाधिक काळ पदे भोगल्यामुळे शिवसेनेच्या वाढीसाठी खैरे यांनी सढळ हस्ते रसदही पुरवली. धार्मिक वृत्तीच्या खैरेंचा जनसंपर्क, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची पद्धत यामुळे संपुर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख आहे.

पक्षांतर्गत विरोधकांना शांत कसे करणार?

आनंदचा क्षण असो, की दुःखाचे सावट बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून खैरे हजर राहायचे. अगदी राज्याबाहेर देशात कुठेही मदत करण्यासाठी ते तत्पर असायचे. खासदार असताना दिल्लीतील त्यांचे निवासस्थान 'युपीएससी'चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर कायम आधार ठरले. मतदारसंघातील सर्वसामान्य लोक दिल्लीत गेले की हमखास त्यांचा मुक्काम खैरे यांच्या बंगल्यात व्हायचाच. आपल्या 35-40 वर्षाच्या राजकारणात खैरे यांनी लोक जमवली, संपर्क वाढवला तसे त्यांचे शत्रूही निर्माण झाले.

uddhav thackeray chandrakant khaire
Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी टाकला डबल केसरी डाव; विशाल पाटलांनी दिल्ली गाठली...

फूट पडल्यानंतर खैरेंच्या नावाची चर्चा नाही

विरोधकांपेक्षा त्यांना पक्षांतर्गंत विरोधकांशीच अधिक लढावे लागले. अर्थात काही चुका खैरे यांच्याही झाल्या आणि त्याची किमंत त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. परंतु, पराभवानंतरच्या पाच वर्षातही खैरे यांनी आपला संपर्क कमी होऊ दिला नाही, उलट तो वाढवण्यावरच जोर दिला. राज्यात पक्ष फूटला तेव्हा अनेकांची नावे जाणाऱ्यांच्या यादीत घेतली जात होती. पण, खैरेंबद्दल त्यांचे विरोधकही कधी अशी चर्चा करताना दिसले नाही, यातच त्यांचे यश म्हणावे लागेल.

दानवेंच्या नावाचा आग्रह पण ठाकरेंची पसंती खैरेंनाच

गेल्या निवडणुकीत खैरेंचा झालेला पराभव, त्यावेळची राजकीय परिस्थिती, अंतर्गत गटबाजी, भाजपच्या नेत्यांनी युती असताना अपक्ष उमेदवाराला केलेली मदत आणि या सगळ्या कारस्थानानंतरही खैरेंचा केवळ चार हजार मतांनी झालेला पराभव बरंच काही सांगून जातो. त्यामुळे पक्षातून अंबादास दानवे यांनी लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला, तरी ठाकरेंनी मात्र खैरेंच्या नावालाच पसंती दिली.

बालेकिल्ला मजबुत करण्याचे आव्हान

चंद्रकांत खैरे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली आहे. परंतु त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही याची जाणीव त्यांना ठेवावी लागेल. पक्ष फुटल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला सहानुभूती असली तरी केवळ या मुद्यावर खैरे विजयी होऊ शकत नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा याही निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तसे झाले तर खैरेंची अडचण वाढणार आहे.

खैरेंना संकटाचा सामना करावा लागणार

दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीचाही फायदा काही प्रमाणात का होईना पण खैरेंना झाला होता. तो पक्ष आता विरोधात असणार आहे, पक्ष फुटल्यामुळे गेल्या निवडणुकीत सोबत असलेली निम्मी शिवसेना (शिंदे गट) विरोधात काम करणार आहे. त्यामुळे संकटमोचन भद्रामारोतीचे निस्सीम भक्त असलेल्या खैरेंना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. महाविकास आघाडी असली तरी घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जिल्ह्यातील ताकद मर्यादित आहे. शिवया त्यांनी आहे ती ताकद पुर्णपणे खैरेंच्या पाठीशी उभी करणे गरजेचे आहे, तेव्हाच विजयाचे उदिष्ट गाठणे शक्य होणार आहे.

uddhav thackeray chandrakant khaire
Nashik Loksabha Election 2024 : ठाकरेंनी मारले एका दगडात दोन पक्षी, आता वाजेंविरोधात गोडसे की भुजबळ?

वंचित-शिवसेना युती संपल्यात जमा

'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयात मोठा वाटा असलेली वंचित आघाडी त्यांच्यासोबत नाही ही त्यांची कुमकूवत बाब असली तरी मराठा उमेदवारामुळे होणारे मत विभाजन ही त्यांच्यासाठी ताकद ठरू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी केलेली युती संपल्यात जमा असल्याचे सांगून केवळ खैरेच नाही तर ठाकरे गटाच्या राज्यातील इतर मतदारसंघाच्या उमेदवारांचेही टेन्शन वाढवले आहे.

ठाकरे गटाचे सर्व उमेदवारांचे देव पाण्यात?

अर्थात आघाडीतील नेत्यांचे आंबेडकरांशी अजूनही बोलणे सुरू असल्यामुळे त्यातून तोडगा निघावा, यासाठी आज उमेदवारी जाहीर झालेले ठाकरे गटाचे सगळे उमेदवार देव पाण्यात घालून बसले नाही तर नवलच. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीतील शिवसेना लढवणार की भाजप? यावरही खैरेंच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. स्वतः खैरेंना शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विरोधात असावा अशी इच्छा आहे. संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर ठाकरे गटाच्या प्रचाराला अधिक धार येऊन गद्दारी, पन्नास खोके आणि हिंदुत्वाचा मुद्दा असा दारूगोळा घेऊन हल्ला चढवणे सोपे होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भुमरे की कराड?

शिवाय भुमरेंच्या पैठण मतदारसंघ संभाजीनगरात येत नसल्यामुळे मतदार त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून नापसंत करतील, असा दावा केला जातोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुमरे यांना उमेदवारी देऊन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचे श्रेय आणि त्यातून संभाजीनगरात विजयाची आशा आहे. दुसरीकडे भाजपने अजूनही या जागेवरचा दावा सोडलेला नाही. स्वतः गृहमंत्री अमित शाह यांना संभाजीनगरची जागा भाजपने लढवावी, अशी तीव्र इच्छा आहे. त्यामुळे ते या जागेवर शिंदेशी तडजोड करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपकडून लोकसभेची संपुर्ण तयारी केलेल्यांमध्ये एकमेव डॉ. भागवत कराड यांचे नाव आघाडीवर आहे.

खैरेंना 'हिंदू वोट बँक' मजबूत करावी लागणार

भाजपने गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे उमेदवारी कराड किंवा सावे यांना मिळाली तरी पक्षाची संघटनात्मक बांधणीचाच यात मोठा वाटा असणार आहे. या सगळ्या परिस्थितीत खैरे यांना आतापर्यंत त्यांनी राखलेली 'हिंदू वोट बँक' मजबूत करावी लागेल. त्यात फूट न पडता भाजपसोबत नसल्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यावर भर द्यावा लागणार आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षात ठाकरे गटाने घेतलेली तटस्थ भूमिकाही खैरे यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. विशेष म्हणजे पक्षांतर्गत विरोध वाढणार नाही यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिलेला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हा सल्ला खैरे यांना कटाक्षाने पाळावा लागले.

( Edited By : Akshay Sabale )

uddhav thackeray chandrakant khaire
Parbhani Loksabha Constituency : उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेच्या निष्ठेची मशाल जाधवांच्या हाती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com