Omraje Nimbalkar, Suresh Birajdar, Dhananjay Sawant Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 News : महायुतीत धाराशिव कुणाला, उमेदवार कोण? सस्पेन्स कायम; उत्सुकता शिगेला

Political News : जागा सोडवून घेण्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असून, तिन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे.

अय्यूब कादरी

Dharashiv News : महायुतीतील कोणत्या पक्षाला धाराशिव लोकसभा मतदारसंघ मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. ते निश्चित झाल्यानंतर उमेदवार ठरवतानाही संबंधित पक्षाला कसरत करावी लागणार आहे. महायुतीत हा सस्पेन्स कायम असताना महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मात्र गावोगावी भेटी देण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. महायुतीतील शिवसेनेच्या नेत्यांनी दोन -तीन दिवसांपूर्वी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली, मात्र त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाल्याचे चित्र नाही. यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जागा सोडवून घेण्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असून, तिन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. (Lok Sabha Election 2024 News )

उस्मानाबाद मतदारसंघांसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे, मात्र जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची लांबलचक यादी आहे. त्यात सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांचा समावेश आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. जागावाटप आणि उमेदवारीचा निर्णय लवकर होत नसल्याने सस्पेन्स वाढला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटानेही उस्मानाबाद मतदारसंघावर मजबूत दावा केला आहे. शिंदे गटाकडून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे इच्छुक असून, त्यांनी गावांना भेटी देत मतदारांशी संपर्क वाढवला आहे. पालकमंत्री सावंत यांनी स्वतः लढावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या फुटीनंतर प्रारंभी ठाकरे गटात राहिलेले माजी खासदार प्रा. गायकवाड यांनी नंतर शिंदे गटात प्रवेश केला. विद्यमान खासदार ठाकरे गटाचे असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानेच कदाचित त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असावा. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. गायकवाड यांना त्यावेळी उमेदवारीचा शब्द दिला होता, असे सांगितले जाते.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही इच्छुक आणि नेत्यांनी मुंबईत सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात शिंदे सेनेचे इच्छुक आणि नेत्यांसह भाजपचे इच्छुक आणि आमदारांचा समावेश होता. जागावाटपाचा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. मतदारसंघात शिंदे सेनेला सोडावा, अशीही मागणी या पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली. त्याला आता जवळपास तीन दिवस उलटले तरी यापैकी एकही निर्णय झाला नाही. जागा सोडवून घेण्यासाठी तिन्ही पक्षांतील रस्सीखेच आणि तिन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हा पेच निर्माण झाला आहे. सस्पेन्स वाढत असल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार

ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी मात्र ही संधी साधत, महायुतीकडे (Mahayuti) आपल्याविरोधात उमेदवार नाही, असा प्रचार सुरू केला आहे. मी सर्वांचे फोन उचलतो, नाही उचलले तर कॉलबॅक करतो, हा नॅरेटिव्ह खासदार राजेनिंबाळकर यांनी सेट केला आहे. त्यावर मात करताना विरोधकांच्या नाकीनऊ येणार आहेत. हे कमी की काय म्हणून आता राजेनिंबाळकर यांनी माझ्याविरोधात महायुतीकडे उमेदवार नाही, असे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसे झाले तर महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT