Let.Pundalik Hari Danve
Let.Pundalik Hari Danve Sarkarnama
मराठवाडा

लोकसभा बरखास्त होताच रेल्वेचा पास जमा करत साधारण डब्याने प्रवास करणारे `पीएचडी`

सरकारनामा ब्युरो

भोकरदन ः जालना लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिक हरी दानवे सर्वत्र `पीएचडी` या टोपण नावाने प्रसिद्ध होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पुंडलिकराव दानवे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. आपल्या राजकीय जीवनाला त्यांनी भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सुरुवात केली.

१९६७ साली ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार या गावचे पंधरा वर्ष सरपंचपद त्यांनी भूषविले. त्यानंतर पंचायत समिती भोकरदनच्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला होता. जालना जिल्हा औरंगाबादमध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे बाबुराव काळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली.

पाचवेळा जालना लोकसभा मतदार संघातून त्यांनी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यात त्यांना दोनदा यश आले. १९७७ च्या जनता लाटेमध्ये ते खासदार झाले, त्यानंतर १९८९ मध्ये अल्पकाळच्या लोकसभेचे देखील ते सदस्य होते. १९८९ ची लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता.

व्ही पी सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना फोडण्याचा ही प्रयत्न झाला होता परंतु त्यांनी आपल्या निष्ठा भारतीय जनता पक्षासोबत कायम ठेवल्या होत्या. बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर राहूनही त्यांनी आपला साधेपणा कधी सोडला नाही. भोकरदन तालुक्यातील एका पिंपळगाव सुतार या छोट्याशा गावात जन्मलेले पुंडलिक हरी दानवे आपल्या बुद्धीमत्तेच्या व जनसंपर्काच्या जोरावर लोकसभेतही चमकले.

गावागावात फिरून भाजपचे संघटन वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भाजपचे प्राबल्य नव्हते तेव्हा भाजपचे संसदेत केवळ दोनच खासदार देशातून निवडून गेले होते. त्यात अटल बिहारी वाजपेयी व महाराष्ट्रातून एकमेव पुंडलिक हरी दानवे यांचा समावेश होता. १९५२ पासून राजकारणात सक्रिय असलेले पुंडलिक हरी दानवे यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. आणीबाणीच्या काळात पत्नी आजारी असतांना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

काही काळ शिक्षक म्हणून काम केलेल्या पुंडलिक हरी दानवे यांच्या हातून अनेकजण घडले. त्यामुळे ते मास्तर म्हणून देखील ओळखले जायचे. पिंपळगांव ग्रामपंचायतचे बिनविरोध १५ वर्ष सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली. पाच वर्षे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद या स्तरावरून राजकारण करत १९६७ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढवली.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पुंडलिक हरी दानवे यांनी चक्क बैलगाडीने प्रचार केला, पण त्यांना अवघ्या पंधराशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि तात्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांचे निकटवतीय तथा माजी महसूल मंत्री माणिकराव पालोदकर यांचा पराभव केला. पुन्हा १९८९ साली भाजपाकडुन त्यांनी निवडणुक लढवून बाळासाहेब पवार यांना पराभूत करून ते जालना लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा खासदार झाले.

मी तर जन्मजात `पीएचडी` म्हणजे पुंडलिक हरी दानवे असे ते नेहमी गंमतीने सांगायचे. भारतीय जनसंघाचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, सुंदरसिंह भंडारी, दत्तोपंत ठेंगडी, कर्नाटक केसरी जगन्नाथ जोशी, यादवराव जोशी आदीं समवेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यांच्यासोबत पक्ष कार्य करण्याची संधी देखील त्यांना मिळाली होती.

पुंडलिकराव दानवे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे वय ८६ वर्षे यांचे २८ ऑक्टोंबर रोजी निधन झाले. २९ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर चार दिवसातच पुंडलिकराव दानवे यांचेही निधन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT