Mahavikas Aghadi Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यानंतर आता महाविकास आघाडीची परीक्षा!

Jagdish Pansare

Latur Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीतील तीनही पक्षांचे संयुक्त मेळावे नुकतेच पार पडले. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी, हिंगोली, बीड या आठही जिल्ह्यात महायुतीचे मेळावे पार पडले. या मेळाव्याची चर्चाही झाली, पण ती प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे.

राज्यातील सत्तेसाठी महायुतीच्या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी जिल्हा तालुका पातळीवर मात्र ते होऊ शकलेले नाही, हे दिसून आले होते. महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांनंतर आता महाविकास आघाडीसाठीही असे मेळावे परीक्षाच ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीत मतभेद असल्याचे लपून राहिलेले नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष अजून तरी महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकसंध आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत, मात्र हा वाद टोकाचा नाही हीच काय ती समाधानाची बाब. येत्या 29 तारखेला महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा लातूरमध्ये होत आहे. या मेळाव्याची पुर्वतयारी म्हणून माजी मंत्री आमदार अमित देशमुख व जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक पार पडली. यावेळी जनतेचे महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवूनआगामी निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी मंडळींचा डाव असल्याचा आरोप करत अमित देशमुख यांनी निवडणूक प्रचाराचा एका अर्थाने बारच उडवला.

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, या व इतर महत्त्वाच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटवून केवळ भावनिक साद घालत आगामी निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी मंडळींचा डाव आहे, तो डाव हाणून पाडण्यासाठी, राज्यभरात विभागीय बैठका घेऊन काँग्रेस पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे. 29 जानेवारी रोजी लातूर येथे मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले.

लातूरच्या परंपरेला शोभेल अशी विभागीय बैठक येथे पार पडेल, या दृष्टीने नियोजन करावे, त्या नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. बूथ, वार्ड, प्रभाग, गाव, शहर, तालुका, जिल्हा या सर्व पातळीवर पक्ष बांधणी

करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या विभागीय बैठकीत बैठकीत होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT