MP Imtiaz Jaleel and Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel Vs Amit Shah : 'मजलीस को उखाड फेंकोगे ना...' ; अमित शाहांचे विधान जलील यांच्या जिव्हारी!

Loksabha Election 2024 : भागवत कराड यांनी केलेल्या टीकेलाही जलील यांनी दिले आहे प्रत्युत्तर, जाणून घ्या काय म्हणाले?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : 'छत्रपती संभाजीनगरवालो मजलीस को उखाड फेंकोगे ना...' असे आवाहन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षावर निशाणा साधला होता. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जेव्हा अमित शाह यांच्या सभेचे नियोजन सुरू होते, तेव्हा मोठा नेता आहे, तर मैदानही मोठे घ्यायचे ना, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी भाजपला डिवचले होते. त्याची सव्याज परतफेड अमित शाह यांनी आपल्या सभेतून परत केली.

थेट नव्या निजामांना घरी बसवा, मजलीस को उखाड फेको, अशा शब्दांत त्यांनी इम्तियाज जलील यांची तुलना निजाम, रझाकारांशी केली. अमित शाह(Amit Shah) यांची ही टीका इम्तियाज यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अमित शाह यांनी उखाड फेकोगे क्या? सह भाजपच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला सविस्तर उत्तर दिले. दोन खासदार असलेल्या आमच्यासारख्या छोट्या पक्षावर देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना आपल्या भाषणात बोलावे लागले, यातच माझे आणि माझ्या पक्षाचे महत्त्व लक्षात येते, असा टोला इम्तियाज यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) म्हणाले, माझी तुलना निजाम, रझाकाराशी केलीली मी खपवून घेणार नाही. निजाम, रझाकार होते ते मेले, आमचा त्यांच्यांशी वारंवार संबंध जोडू नका. अमित शाह यांनी मला उखडून फेकण्याची भाषा करण्याऐवजी त्यांच्या सहकार खात्याशी संबंधित एका पतसंस्थेने माझ्या मतदारसंघातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवले यावर बोलायला हवे होते.

देशातील बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी तुमच्या सरकारने काय केले? हे सांगायला हवे होते. पण ते न सांगता त्यांनी मला उखडून फेकण्याची भाषा केली. मला उखडून फेकने तुमच्या हातात नाही, देशात लोकशाही आहे, जर मतदारांना वाटत असेल मी त्यांच्यासाठी काहीच काम केले नाही, तर त्यांनी मला मतदान करू नये.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड(Bhagwat Karad) यांनी त्यांच्या भाषणात मी पाच वर्षांत काय काम केले? असा सवाल केला होता. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे, वेळ, तारीख, ठिकाण त्यांनी ठरवावे मी चर्चेला तयार आहे. पाचपैकी दोन वर्षे कोरोनात गेली, मला या दोन वर्षांत एक रुपयाही निधी मिळाला नाही, त्यामुळे जी तीन वर्षे मला मिळाली त्या काळात काय काम केले हे मी जाहीरपणे सांगायला तयार आहे, तुमची तयारी आहे का? असा सवालही इम्तियाज यांनी कराड यांना केला. केवळ निवडणुका आल्या की हिंदू-मुसलमान जातीचे राजकारण करायचे ही भाजपची जुनीच सवय असल्याचे इम्तियाज म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT