Sharad Pawar and Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : नांदेड जिल्ह्याची महाविकास आघाडीची जबाबदारी आता पवार- ठाकरेंवरच..

Mahavikas Aghadi : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता नांदेडची महाविकास आघाडीची जबाबदारी आता पवार- ठाकरेंवरच आली आहे.

Laxmikant Mule

Nanded Political News: राज्यातील महाविकास आघाडीच्या संपूर्ण प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अगदी हा निर्णय घेण्याच्या एक दिवस आधी जागा वाटपाच्या बैठकीलाही ते हजर होते. मात्र दुसऱ्या दिवशी चव्हाणांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. (Mahavikas Aghadi Nanded)

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची कर्मभूमी असलेल्या नांदेडमधील संपूर्ण जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीने टाकली होती. मात्र आता हाच खांदा निखळून पडला असल्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरच आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाचा धक्का जसा काँग्रेसला बसला तसा महाविकास आघाडीलाही. नांदेडमधील परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आले आणि गेले असेच म्हणावे लागेल. नांदेडला सध्या कोणी वाली राहिले नाही. त्यामुळे नांदेडमधील महाविकास आघाडीची जबाबदारी आता ठाकरे-पवार यांच्यावर आली आहे.

सेनापती युद्धभूमी सोडून गेल्यानंतर सैन्य जसे सैरभैर होते तशीच परिस्थिती नांदेडच्या काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची झाली. काँग्रेसच्या बुडणाऱ्या जहाजात थांबायला कोणीच तयार नाही. नांदेडमधील परिस्थिती सुधारायची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच उचलावी लागणार आहे. विशेष म्हणजे अगदी थोड्या वेळात महाविकास आघाडीला सावरावे लागणार आहे.

जिल्हातील काँग्रेसचे स्थानिक नेते अशोक चव्हाण यांच्या विरोधात उघडपणे येण्यास तयार नाहीत. महाविकास आघाडीत अशोक चव्हाण असताना आघाडीची व काँग्रेसची परिस्थिती मजबूत होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याने काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी केली होती.

पण चव्हाणांनी सर्व तयारी करून ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी आमदार प्रदीप नाईक, हरिहराव भोसीकर, डॉ. सुनिल कदम यांसह अन्य ज्येष्ठ नेते आहेत. तर शिवसेना ठाकरे गटातही माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, भूजंग पाटील, बबनराव बारसे यांच्यासह शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी आहेत.

या पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क असून संघटनात्मक पातळीवर काम आहे. या सर्वांनी एकत्र बसून महाविकास आघाडीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन नव्याने मोट बांधण्याची गरज आहे.

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण हे तळ ठोकून आहेत. ते दररोज पक्षप्रवेश सोहळे करत आहेत. काँग्रेसमधील होणारी पडझड थांबविण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडी कमकुवत होत आहे. नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी आघाडीच्या घटक पक्षांची व्यापक बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे.

यासाठी शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रमुख नेते राज्यभर दौरे करतील यामध्ये त्यांनी मराठवाड्याला प्राधान्य दिले तरच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढता येईल. शिवाय नांदेडचीही परिस्थिती सुधारेल.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT