Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Parbhani VBA : आघाडीत घेतले नाही, तर 'वंचित' अनेकांचा खेळ बिघडवणार?

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीने अनेक प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. या आघाडीच्या उमेदवारांनी राज्यासह मराठवाड्यातील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोंनी मते मिळवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव अशा सगळ्या मतदारसंघांत 'एमआयएम'-'वंचित' युतीने उमेदवार देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा खेळ बिघडवला होता.

मोदीलाटेत निवडून आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून झालेला पराभव ही या युतीचीच देण होती. आता 'एमआयएम' 'वंचित'चा मार्ग स्वतंत्र आहे. प्रकाश आंबेडकर राज्याच्या महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील 'इंडिया' आघाडीत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे ज्या 'वंचित'मुळे अशोक चव्हाण यांच्या नावापुढे माजी खासदार लागले, तेच आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता आंबेडकरांचा आघाडीत समावेश झाला तर ठीक, पण त्यांना सोबत घेतले नाही तर ते कोणाकोणाचा खेळ बिघडवतील ? हे मात्र सांगता येत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर वगळता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राज्यात कुठेच विजयी झाले नाहीत. त्यानंतर स्वतंत्र लढलेल्या 'वंचित'ला विधानसभेत मतं भरपूर मिळाली, पण त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. असे असले तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पराभवाला अनेक मतदारसंघांत 'वंचित'च कारणीभूत ठरली होती.

त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीला 'इंडिया' आघाडीसोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत 'एमआयएम' पक्षही सहभागी होता. त्यामुळे दलित व मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली. परभणी लोकसभा मतदारसंघात 'वंचित'चे उमेदवार आलमगीर खान यांना तब्बल दीड लाख मते घेतली होती. विजयी उमेदवार संजय जाधव आणि द्वितीय क्रमांकावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यातील मतांचा फरक हा अवघा बेचाळीस हजार एवढा आहे.

मराठवाड्यातील बहुतांश मतदासंघात अशीच स्थिती आहे. दलित-मुस्लिम समाजाचे मतदार हे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएम पक्ष असल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार दुरावला गेला होता. वंचित बहुजन आघाडीने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले असले तरी त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय सोपा होत असल्याने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप झाला.

अशाच पद्धतीने 'एमआयएम' पक्षावरही टीका केली गेली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी 'इंडिया' आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. असे झाले तर दलित- मुस्लिम एकगठ्ठा मते इंडिया आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच मिळतील. परंतु असे नाही झाले तर वंचित बहुजन आघाडी ओबीसी प्रवर्गातील नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी समाजात अस्वस्थतेची सुप्त भावना आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील नेत्याला उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित राजकीय नेत्यांचे मतांचे गणित पुन्हा एकदा बिघडवू शकते.

दलित-मुस्लिम हे पारंपरिक मतदार असताना ओबीसी प्रवर्गातून उमेदवार दिला तर दलित मुस्लिम आणि ओबीसी या त्रिसूत्रीने निवडणूक निकाल नक्कीच बदलू शकतो. 'इंडिया' आघाडीच्या उमेदवारास दलित-मुस्लिम मते नाही मिळाली तर ते नुकसानकारक ठसू शकते. तर ओबीसी मते नाही मिळाली तर ते भाजप (BJP) उमेदवारास धोक्याचे चिन्ह असू शकते.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा मतदार लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासोबत अगोदरच युती जाहीर झालेली आहे. 'इंडिया' आघाडीत मात्र त्यांचा अजून अधिकृत प्रवेश झालेला नाही. यासंदर्भात शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला 'इंडिया' आघाडीत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याचे सांगितले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT