Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : पक्षाशी प्रामाणिक तरी आमच्या नेत्यावर अविश्वास का? खासदार संजय जाधव समर्थक शिवसैनिक एकवटले!

Sanjay Jadhav's Supporters Meeting : संजय जाधव समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. परभणीत झालेल्या बैठकीत जाधव यांच्या समर्थनाचा निर्धार करण्यात आला.

Jagdish Pansare

Parbhani Politics News : परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून दिल्यानंतर बैठक घेतली. दोनवेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि पक्षाचे उपनेते म्हणून विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या खासदार संजय जाधव यांच्यावर पक्ष नेतृत्व अविश्वास का दाखवत आहे? असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, संजय जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही समर्थकांनी बोलून दाखवला.

संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या पक्षांतराच्या चर्चेनंतर परभणी जिल्ह्यातील राजकारण वेगाने बदलू लागले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक घेतल्यानंतर जाधव समर्थक जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची उचलबांगडी करण्यात आली.

विष्णू मुरकुटे यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जाधव समर्थक आक्रमक झाले होते. यातूनच 82 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवून आपण संजय जाधव यांच्याच पाठीशी ठामपणे उभे आहोत, हा संदेश दिला.

त्यानंतर आज पाथरी विधानसभा मतदार संघात जाधव समर्थक शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत शिवसैनिकांनी खासदार जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील दोन महिन्यांपासून खासदार जाधव यांच्या पक्ष सोडण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर सकाळी साडेदहा वाजता आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षात सध्या एकतर्फी पक्षांतराची चर्चा सुरू असून खासदारांना एकाकी पाडण्याचे काम सुरू आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने कार्यकर्ते व खासदार जाधव यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला.

गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आमच्यासाठी मातोश्री, पक्ष आणि नेतृत्व म्हणजे खासदार संजय जाधव आहेत. जन्मापासून मरेपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणूनच राहणार, अशा भावना परभणी तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले, विधानसभा प्रमुख डॉ. राम शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बाराहत्ते यांनी भाषणातून व्यक्त केल्या.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी खासदार जाधव यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवरही जोरदार टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर पक्षाचे उपनेते म्हणून खासदार संजय जाधव यांनी अत्यंत एकनिष्ठपणे पक्षाला साथ देत विरोधकांना धारेवर धरण्याचे काम सातत्याने केले आहे. आमदार आणि तीन वेळा खासदार राहूनही पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या नेत्यावर अविश्वास दाखवण्याचे काम पक्षाकडून होत असल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत.

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत खासदार जाधव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विरोधात बैठका घेतल्या जात असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी यावेळी आला. आगामी काळात खासदार जाधव जो निर्णय घेतील, त्या निर्णयामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी पाथरी मतदारसंघातील सर्कल प्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, आजी-माजी सरपंच व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT