

Marathwada Politics News : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच तिकडे दिल्लीत भाजपने आम आदमी पक्षावरच सर्जिकल स्ट्राईक केला. आम आदमी पक्षाचे सात खासदार पक्षाच्या गळाला लागले आहेत. राघव चढ्ढा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने महाराष्ट्रातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. अशातच मराठवाड्यातील परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव सातत्याने पक्षाच्या बैठकांना दांडी मारताना दिसत आहेत.
शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसापुर्वी परभणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आढावा बैठका घेतल्या. या बैठकांना आमदार राहुल पाटील व जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. मात्र खासदार संजय जाधव या बैठकीकडे फिरकले नाहीत. अंबादास दानवे यांचा दौराच मुळात संजय जाधव पक्ष सोडून जाणार का? ते गेले तर पक्षाचे किती नुकसान होऊ शकते? याचा अंदाज घेण्यासाठी होता अशी चर्चा होती.
अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शनिवारी मुंबईत जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक मुंबईतील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडली. शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, महापौर सय्यद इक्बाल आणि इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते.
अपेक्षेप्रमाणे खासदार संजय जाधव या बैठकीला गैरहजर राहिले. यापूर्वी ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरच गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक मुंबईत घेतली होती. पण या बैठकीलाही खासदार जाधव गैरहजर राहिले होते. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच ते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहणारे संजय जाधव भाजपच्या व्यासपीठावर मात्र दिसू लागले आहेत.
राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या खासदार रामराव वडकुते यांच्या नागरी सत्कार समारंभात संजय जाधव आवर्जून हजर होते. तिथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर, सुरेश वरपडूकर, खासदार वडकुते यांनी आपल्या भाषणातून संजय जाधव हे आता आमच्यासोबत येणार आहे, असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकूणच परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षांतर करणार, असे त्यांच्या कृतीतून दिसू लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.