Nana Patole Sarkarnama
मराठवाडा

Congress Leader Nana Patole : संभाजीनगरची जागा काँग्रेसला दिली असती तर महायुतीची कीड मराठवाड्यातून हटवली असती..

Maha Vikas Aghadi has majority in Maharashtra : राज्यात काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा राहिल हे मी नाही तर विविध एजन्सींनी केलेले निवडणूक पुर्व सर्व्हे सांगत आहेत. महायुती शंभरच्या पुढेही जाऊ शकणार नाही, पण म्हणून शांत बसून चालणार नाही, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी जीवाचे रान करावे

Jagdish Pansare

Latur Congress News : लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही मागितली होती. ही जागा काँग्रेसला मिळाली असती तर मराठवाड्यातून महायुतीची कीड हटवली गेली असती, मराठवाडा मुक्त झाला असता, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचे कौतुक केले. लातूर येथील विभागीय काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांच्या उपस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा शंखनाद करण्यात आला.

यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. मराठवाड्यात काँग्रेसला शंभर टक्के यश मिळाल्याचे सांगतानाच छत्रपती संभाजीनगरची जागा काँग्रेसने मागितली होती, पण ती मिळाली नाही. ती मिळाली असती तर मराठवाड्यातून महायुतीची कीड गेली असती असे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकी राज्यात महाविकास आघाडीला 185 जागा मिळतील, असा दावा केला.

राज्यात काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा राहिल हे मी नाही तर विविध एजन्सींनी केलेले निवडणूक पुर्व सर्व्हे सांगत आहेत. महायुती शंभरच्या पुढेही जाऊ शकणार नाही, पण म्हणून शांत बसून चालणार नाही, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

विलासराव देशमुख नेहमी सांगायचे की नांदेड हे माझ्या राजकीय गुरूंचे शहर आहे, त्याला काही कमी पडता कामा नये. (Congress) आताही आपली तीच भूमिका असली पाहिजे, नांदेडची गाडी आता सुंदर, स्वच्छ असेल. या गाडीत गडबड करणारे लोक आता नको. नांदेडची जनता आपल्यासोबत आहे, त्यामुळे या जिल्ह्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावे, लागेल असेही पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात महायुतीचे आणि देशात मोदींचे सरकार चुकून आले आहे. पंतप्रधान राहुल गांधीच व्हायला पाहिजे, असे आता लोकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार हे भाजप आणि आरएसएसच्या विचारांनी चालते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा फक्त मुखवटा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीकडे बोट दाखवले जाते. आम्ही भूमिका घेतली नाही, असा आरोप केला जातो. पण आम्ही आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे.

करेक्ट कार्यक्रमाची भाषा, अन् दोष आम्हाला..

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्या, हे आम्ही सांगितले. दुसरीकडे मनोज जरांगे आमचा कार्यकर्ता आहे याची कबुली एकनाथ शिंदे यांनी विधानसभा परिसरात माझ्याशी बोलतांना दिली होती हे सगळ्या जगाने पाहिले. नंतर मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे जरांगे पाटील यांना उद्देशून ते म्हणाले होते. याचा अर्थ संपुर्ण मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम त्यांना करायचा आहे असाच अर्थ यातून निघतो, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला.

आरक्षणाच्या प्रश्नावरून आमच्यावर टीका करता, पण गुलाल तुम्हीच उडवला. आम्ही आमची भूमिका अनेकवेळा स्पष्ट केली. राज्यात, केंद्रात तुमचे सरकार आहे, मग तुम्हाला कोणी थांबवले ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थितीत केला. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून महालक्ष्मी योजना सुरू आहे. हीच योजना आपले सरकार आले तर महाराष्ट्रात सुरू करु आणि या पेक्षा जास्त पैसे महिला भगिनींना देऊ. महागाई कमी करण्यासाठी नियोजन करू, अशी ग्वाही नाना पटोले यांनी यावेळी दिली.

फडणवीस ठोकून काढा सांगतो..

2014 पासून मोदींनी किती घोषणा केल्या, त्या आता कोणालाच आठवत नाही. फडणवीस हेच महाराष्ट्रात सांगत आहेत, असे सांगत पटोले यांनी फडणवीसांचा ऐकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांना राज्यातील शैक्षणिक धोरण भंगार करायचे आहे. तुम्हाला यांना पुन्हा गुलामीकडे न्यायचे आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

विधानसभेची निवडणुक महाराष्ट्राच्या स्वाभीमानाची आहे हे सांगतानाच फडणवीस सांगतो सगळ्यांना ठोकून काढा, राज्याचा गृहमंत्री आहे, तो मारायला सांगतो. याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते भडकावण्याचे काम करणार आहेत, असा सावधानतेचा इशारा पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. लोकसभेला आपण दिलेल्या पाच गॅरंटीवर लातूरमध्ये चांगले काम झाले, माझ्याकडे त्याचा अहवाल आहे.

जागा वाटप, निवडणुकीसाठीचे धोरण शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून ठरवणार आहोत, असे सांगतानाच अजित पवारांनी गुलाबी जॅकेट कशासाठी घातले? असा सवाल करत हे शिंदे-फडणवीस-अजित पवार पोकलेनने महाराष्ट्राला लूटत असल्याची टीका पटोले यांनी केली. मतांचे विभाजन होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, सध्या जे सर्व्हे समोर येतायेत त्यात महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.

भाजप-महायुती शंभरमध्ये अडकेल, हा आमचा आकडा नाही, हा एजन्सींनी दिलेला आकडा आहे. पण घरी बसून हे घडणार नाही, आपल्याला मेहनत करावी लागेल. जे कार्यकर्ते, प्रामाणिकपणे काम करतील, त्यांना यापुढे संधी देणार, असा शब्द पटोले यांनी दिला. बुथवर जो जिंकेल तोच निष्ठावान, असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्षापासून झाल्या नाही. या संस्थांचे अस्तित्व संपवण्याचे काम भाजप-महायुती करत आहे. आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सगळ्या निवडणुका घेऊ, असे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT