Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar News : महादेव जानकरांचा ठरला अखेर मतदारसंघ; माढा नाही तर...

Political News : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रासपने नाराजीचा सूर आळवत स्वतंत्रपणे लढण्याचा इरादा स्पष्ट केला होता. जानकर यांनी केवळ परभणीच नाही तर माढा लोकसभा मतदारसंघातूनही लढण्याची तयारी सुरू केली होती.

Jagdish Pansare

Parbhani News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन महिन्यांपूर्वी परभणीत येऊन आपण इथून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारही, असा दावा केला होता. दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रासपने नाराजीचा सूर आळवत स्वतंत्रपणे लढण्याचा इरादा स्पष्ट केला होता. जानकर यांनी केवळ परभणीच नाही तर माढा लोकसभा मतदारसंघातूनही लढण्याची तयारी सुरू केली होती.

त्यांचे दबावतंत्र आणि जानकर स्वतंत्र लढल्यास त्याचा फटका भाजप महायुतीला बसू शकतो, हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली. ती यशस्वी झाली आणि जानकरांनी महायुतीसोबतच राहण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यानंतरही जानकर कोणत्या लोकसभा मतदारसंघातून लढणार, अशा चर्चा सुरूच होत्या, त्याला स्वतः जानकरांनीच पूर्णविराम दिला आहे.

आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे माढा मतदारसंघातून त्यांच्या लढण्याची शक्यता आता मावळली आहे. दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यासाठी आग्रही होते. परंतु जानकरांनी वेगळी भूमिका घेण्याचे दबावतंत्र वापरले आणि सूत्रं हलली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जानकरांचा मार्ग ठरला. त्यानंतर आज त्यांनी आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर करून टाकले. राज्यासह मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षांचे जागावाटप रखडले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. मात्र, जानकरांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचे सांगून टाकले. तत्पूर्वी भाजपतर्फे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकरांचाही उमेदवारीसाठी आग्रह होता. परंतु महायुतीतील घटक पक्षांना नाराज न करण्याचे धोरण असल्यामुळे अनेक तडजोडी केल्या जात आहेत. जानकरांसाठी परभणी मतदारसंघ सोडणे हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणीच का?

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची सुरुवातीपासून परभणी लोकसभा मतदारसंघालाच पसंती होती. याच मतदारसंघातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे निवडून आलेले आहेत. त्याशिवाय रासपने (Rsp) या मतदारसंघात बूथस्तरावरील काम ९० टक्के पूर्ण केले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. तसेच, जानकर यांनी ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात हजेरी लावून ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका घेतली होती. या निवडणुकीत ओबीसींची मते एकगठ्ठा पडू शकतात, अशा स्थितीत जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याचे बोलले जाते.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT