Maharashtra Government News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व इतरांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा नुकताच दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देत दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढतो, असा शब्द दिला होता. त्यानूसार गणपती विसर्जनानंतर सरकारने लगेच राज्यातील ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर केला.
२६५ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती पाहता महायुती सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मराठवाड्यात राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत गंभीर परिस्थिती होती. त्यामुळे मराठवाड्यातील ७६ पैकी तब्बल ७४ म्हणजे ९५ टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या जीआरनूसार छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
पावसाने दिलेली दीर्घ ओढ, अनेक भागांत झालेली पर्जन्यतूट आणि त्यामुळे खरीप पिकांवर आलेले संकट लक्षात घेता राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तब्बल ७४ तालुक्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ सप्टेंबर रोजी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'ट्रिगर-१'च्या आधारे शासन आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. एखादा भाग पहिल्या टप्प्यात वगळला गेला, तर पुढील टप्प्यात 'ट्रिगर-३'च्या माध्यमातून त्याचा समावेश करण्याची प्रक्रिया केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शासनाच्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांना Trigger-1 लागू करण्यात आला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या स्थितीकडे आता शासन यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे. पावसातील खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर आदी पिकांवर परिणाम झाल्याची स्थिती अनेक भागांत दिसून येत आहे.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय चित्र
जालना जिल्ह्यातील ८ -बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील ११ - गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी.
लातूर जिल्ह्यातील १०- लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट. तर धाराशिव जिल्ह्यातील ८- धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा या तालुक्यात 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला आहे.
नांदेडमधील दोन तालुके वगळले
नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्याचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. मुखेड आणि मुदखेड हे दोन तालुके यातून वगळण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील ज्या ९ तालुक्याचा समावेश आहे त्यामध्ये पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी. तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर ९, जालना ८, बीड ११, लातूर १०, धाराशिव ८, नांदेड १४, परभणी ९ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ अशा एकूण एकूण मराठवाड्यातील ७४ तालुके हे Trigger-1च्या कक्षेत आले आहेत.
‘ट्रिगर-१’ म्हणजे नेमके काय?
दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ नुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध टप्प्यांची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. Trigger-1 हा त्यातील प्रारंभीचा महत्त्वाचा टप्पा आहे. उपलब्ध सरकारी पद्धतीनुसार पर्जन्यमान आणि पावसातील खंड यांसारख्या घटकांच्या आधारे प्राथमिक स्वरूपात बाधित तालुके निश्चित केले जातात. त्यानंतर पुढील निकषांच्या आधारे परिस्थितीचे अधिक सखोल मूल्यांकन केले जाते.
महत्त्वाचे म्हणजे Trigger-1 लागू झाला म्हणजे संबंधित तालुका अंतिमतः गंभीर किंवा मध्यम दुष्काळग्रस्त घोषित झाला, असा त्याचा थेट अर्थ होत नाही. पुढील मूल्यांकन प्रक्रियेत पीकस्थिती, जमिनीतील आर्द्रता, भूजलस्थिती, पेरणीचे क्षेत्र आणि अन्य निकषांचा विचार केला जातो. २०२३ च्या दुष्काळ घोषणेच्या शासन निर्णयातही Trigger-2 नंतर प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे Ground Truthing करण्यात आले होते.
शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार?
सरकारकडून दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पीकनुकसानीची मदत देताना पंचनामा, नुकसान नोंदणी, जिल्हास्तरीय मंजुरी आणि त्यानंतर DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात मदत देण्याची प्रक्रिया आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, पीकनुकसानीसाठी पंचनामे तहसील पातळीवर एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातात आणि मंजुरीनंतर पात्र लाभार्थ्यांना मदत वितरित केली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.