Dr. Bhagwat Karad during his tenure as Union Minister of State for Finance, addressing economic policy discussions amid Rajya Sabha re-election speculation. Sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad : भागवत कराड यांना राज्यसभेची लाॅटरी पुन्हा लागणार?

Bhagwat Karad Rajya Sabha : महाराष्ट्रातील जातीय समीकरण आणि पंकजा मुंडे यांना पर्याय या राजकीय खेळीतून भागवत कराड यांनी 2022 मध्ये अचनाक लॉटरी लागली होती. माजी महापौर आणि पक्ष संघटनेत राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या कराड यांच्या राज्यसभेवरील निवडीने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता.

Jagdish Pansare

BJP News : भाजपाचे विद्यमान राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांची टर्म येत्या दोन तारखेला पूर्ण होत आहे. कराड यांच्यासह राज्यातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आल्याने देशभरातली एकूण 37 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या सहा वर्षापैकी चार-साडेचार वर्ष कराड हे केंद्रात अर्थ राज्यमंत्री होते.

महाराष्ट्रातील जातीय समीकरण आणि पंकजा मुंडे यांना पर्याय या राजकीय खेळीतून भागवत कराड यांनी 2022 मध्ये अचनाक लॉटरी लागली होती. माजी महापौर आणि पक्ष संघटनेत राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या कराड यांच्या राज्यसभेवरील निवडीने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी हा धक्का दिल्यानंतर काही महिन्यात आणखी एक धक्का देत कराड यांना थेट अर्थ खात्याचे राज्यमंत्री केले.

कराड यांचे फळफळलेले नशीब पाहून तेव्हा राज्यातील अनेक भाजप नेत्यांना त्यांचा हेवा वाटला होता. पण उच्चशिक्षित डॉक्टरी पेशा असलेल्या भागवत कराड यांनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि वरिष्ठ नेत्यांचा विश्वासही संपादन केला.

मंत्री असताना आणि ते गेल्यानंतरही भागवत कराड यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानूसार काम सुरूच ठेवले. आता राज्यसभेवरील त्यांच्या कार्यकाळ संपत आल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2022 प्रमाणेच कराड यांची राज्यसभेवर पुन्हा लॉटरी लागणार? की मग भाजप नव्या चेहऱ्याला संधी देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कसे होते कराडांचे प्रगती पुस्तक?

भागवत कराड हे व्यवसायाने डॉक्टर असून छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, शहराचे महापौरही झाले. पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी मराठवाड्यात पक्षाची घडी बसविणे, ग्रामीण भागात संघटन विस्तार करणे या कामात सक्रीय सहभाग नोंदवत प्रदेश पातळीवर लक्ष वेधून घेतले.

2022 मध्ये विधान परिषदेवर संधी न मिळालेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतले जाईल, अशी जोरदार चर्चा महाराष्ट्रात होती. परंतु दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या मनात दुसरेच होते. पंकजा मुंडे यांचा विचार विधान परिषदेनंतर राज्यसभेसाठीही झाला नाही. उलट वंजारा समाजाला नवे नेतृत्व देण्याची खेळी करत दिल्लीतील नेत्यांनी डाॅ. भागवत कराड यांची निवड केली. त्यानंतर अडीच वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, बँकिंग आणि वित्तीय समावेशन यासारख्या विषयांवर त्यांनी सक्रिय काम केले. संसदेत विविध विधेयकांवरील चर्चेत त्यांनी सहभाग नोंदविला. कराड यांनी प्रभावी काम करत मोदी-शहा या आपल्या वरिष्ठ नेत्यांचे मन जिंकले. परंतु 2024 मध्ये अपेक्षित जागा न मिळणे आणि महाराष्ट्रातून भाजपला सर्वात कमी जागा मिळाल्याचा फटका कराड यांना बसला. परिणामी त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. आता राज्यसभेवर पुन्हा संधी मिळेल, या अपेक्षेत कराड व त्यांचे समर्थक आहेत.

राहाटकर यांच्या नावाची चर्चा...

भागवत कराड आणखी एक संधी मिळवण्याच्या प्रयत्नात असले तरी त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांच्याशी स्पर्धा करावी लागणार अशी चर्चा आहे. विजया राहाटकर यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यसभेतील रिक्त जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याने त्यांच्या नावाचीही मोठी चर्चा होताना दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT