Major setback for Abdul Sattar as BJP wins Soygaon Panchayat Samiti Sarkarnama
मराठवाडा

Shivsena-BJP Alliance : अब्दुल सत्तारांना सलग दुसरा धक्का : सोयगाव पंचायत समितीत संजना जाधवांच्या मदतीने भाजपचा सभापती

Shivsena-BJP Alliance : सिल्लोडनंतर आता सोयगाव पंचायत समितीतही भाजपने अब्दुल सत्तार यांना धक्का दिला आहे. आमदार संजना जाधव यांच्या मदतीने भाजपने सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवत सोयगाववर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

Jagdish Pansare

Shivsena-BJP : माजी मंत्री, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का देत सिल्लोडनंतर सोयगाव पंचायत समितीतही भाजपने सत्ता स्थापन केली आहे. सत्तार यांना बाजूला ठेवत कन्नड-सोयगावच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांना सोबत घेत भाजपने सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली होती. निवडणुकीत ही युती कागदावरची ठरली होती. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथे भाजपा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या गटात अब्दुल सत्तार यांची सरशी झाली, पण सिल्लोड आणि सोयगाव या दोन्ही पंचायत समित्या त्यांच्या हातून निसटल्या. सिल्लोडमध्ये 18 पैकी 10 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर शिवसेनेला केवळ 8 जागा जिंकता आल्या. सोयगाव पंचायत समितीमध्ये 6 पैकी भाजप 3, शिवसेना 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 सदस्य निवडून आले.

गोंदेगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकमेव सदस्या गायबाई गोविंद घोडे आमदार संजना जाधव समर्थक मानल्या जातात. त्यामुळे स्वबळावर लढण्याची खुमखुमी दाखवणाऱ्या सत्तार यांना बाजूला ठेवत भाजपने सोयगावमध्ये सत्ता स्थापन केली. सभापती पदी भाजपचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापति म्हणून गायबाई गोविंद घोडे यांची निवड झाली.

सोयगाव पंचायत समितीच्या सभापती, उपसभापति निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार चमत्कार करणार, अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. सत्तार यांचे धूर्त राजकारण जवळून पाहिलेल्या भाजपाच्या नेत्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी ठेवले होते. आज प्रत्यक्ष मतदानासाठी हे सगळे सदस्य एकत्र आले आणि सत्तार यांची कुठलीच खेळी यशस्वी न होऊ देता, दोन्ही पद राखत सत्ता मिळवली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 55 सदस्य निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे 38, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 सदस्य विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाला 2 जागांवर यश मिळाले.

शिवसेनेच्या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांमध्ये पैठण 17, सिल्लोड व कन्नड प्रत्येकी 8, वैजापूर 7, छत्रपती संभाजीनगर 6, गंगापूर 5 तर सोयगाव व फुलंब्रीतील प्रत्येकी 2 सदस्यांचा समावेश आहे. भाजपाच्या पंचायत समिती सदस्यांमध्ये सिल्लोडमधील 10, छत्रपती संभाजीनगर 7, गंगापूर 6, कन्नडमधील 4, सोयगाव, फुलंब्री व खुलताबादमधील प्रत्येकी 3 तर वैजापूर मधील 2 सदस्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT